राज्य सरकारने पूरग्रस्त मदतीचा निर्णय बदलला नाही तर जलसमाधी घेणार राजू शेट्टी


पुणे – जुलैमध्ये आलेल्या महापुराला एक महिना पूर्ण झाला असून राज्य शासनाकडून आतापर्यंत तुटपुंजी मदत मिळालेली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य शासनाच्या या भूमिकेच्या विरोधात आजपासून पंचगंगा परिक्रमा आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी सकाळी प्रयाग चिखली या तीर्थक्षेत्री त्यांनी अभिषेक घालून याची सुरुवात केली. येथून त्यांच्या आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे.

जुलैमध्ये कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यामध्ये महापूर आला. यामध्ये शेती, घरे, दुकाने यांची अतोनात हानी झाली. पण २०१९ सालच्या तुलनेत यावर्षी केलेली मदत अत्यंत तोकडी असल्यामुळे राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे. तेव्हाप्रमाणे शासनाने यावर्षी मदत करावी, अशी मागणी करत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

राज्य सरकारने महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी हे निकष बदलावे आणि तातडीने शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, या मागणीसाठी गेल्या आठवड्यात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. पूरग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चावेळी राजू शेट्टी यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली होती.

पूरग्रस्त मदतीचा निर्णय राज्य सरकारने बदलला नाही, तर चिखलीतून नरसोबावाडीच्या दिशेने जाऊन जलसमाधी घेणार आहे. जगण्यात काही अर्थ राहिला नाही, तोडगा नाही निघाला, तर सामूहिक जलसमाधी नक्की आहे, असा इशारा शेट्टी यांनी दिला होता.