न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात बांगलादेशने रचला इतिहास


ढाका : न्यूझीलंडला बांगलादेश दौऱ्यावर दुसऱ्या फळीचा संघ पाठवणे महागात पडले. काही दिवसांपूर्वी अशीच चूक ऑस्ट्रेलियन संघाने केली होती आणि पाच सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशने ४-१ असा विजय मिळवला होता. तशीच चूक न्यूझीलंडने केली आणि त्याची प्रचिती पहिल्याच सामन्यात आली. न्यूझीलंड संघाला संपूर्ण २० षटकंच खेळता आली नाहीत. हा सामना बांगलादेशने ७ विकेट्सने जिंकून मालिकेत १-० आघाडी घेतली. बांगलादेशचा हा किवींवरील पहिलाच टी-२० विजय आहे.

बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेला आजपासून सुरूवात झाली. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांना खेळपट्टीवर फार काळ टिकता आले नाही. टॉम ब्लंडल (२), रचिन रवींद्र (०), विल यंग (५) व कॉलिन डी ग्रँडहोम (१) हे चार फलंदाज फलकावर ९ धावा असताना माघारी परतले. कर्णधार टॉम लॅथम (१८) व हेन्री निकोल्स (१७) यांनी संघर्ष केला. पण त्यांचा संपूर्ण संघ ६० धावांत तंबूत परतला. यापूर्वी २०१४मध्ये श्रीलंकेविरुद्ध किवींचा संघ ६० धावांवर माघारी परतला होता. मुस्ताफिजुर रहमानने १३ धावांत ३ विकेट्स घेतल्या, तर नसून अहमद, शाकिब अल हसन व मोहम्मद सैफुद्दीन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

बांगलादेशचे दोन्ही सलामीवीर मोहम्मद नईम (१) व लिटन दास (१) हे फलकावर ७ धावा असताना लक्ष्याचा पाठलाग करताना माघारी परतले. पण, अनुभवी शाकिब अल हसन (२५), मुश्फीकर रहिम (१६*) व कर्णधार महमदुल्लाह (१४*) यांनी संघाला विजय मिळवून दिला. बांगलादेशनं १५ षटकांत ३ बाद ६२ धावा करून बाजी मारली.