महिंद्राने ‘जॅवलीन’ नावासाठी केली नोंदणी

महिंद्रा अँड महिंद्राने या वर्षी अनेक नवी मॉडेल लाँच करण्याची घोषणा केली असून नव्या एक्सयुव्ही ७०० ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाहीर केली आहेत. ही नवी गाडी लवकरच विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. दरम्यान देशाला दीर्घ काळानंतर भालाफेकीत सुवर्णपदक मिळाल्याच्या सन्मानार्थ ‘ जॅवलीन आणि जॅवलीन बाय महिंद्रा’ अशी नावे ट्रेडमार्क म्हणून नोंदविली असल्याचे समजते. नव्या एक्सयुव्ही ७०० च्या स्पेशल एडिशन मध्ये या नावाचा वापर होईल असे सांगितले जात आहे.

भारताला भालाफेक मध्ये टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राचा सन्मान म्हणून आनंद महिंद्र यांनी त्याला विशेष प्रकारे डिझाईन केलेली एक्सयुव्ही गिफ्ट केली जाणार असल्याची घोषणा पूर्वीच केली आहे. या शिवाय या वर्षात महिंन्दाची मराजो एटीएम व्हर्जन २०२१ वर्षअखेरी सादर होत आहे. नव्या पिढीची स्कॉर्पियो २०२२ हे नव्या वर्षातील कंपनीचे पहिले लाँच व्हेईकल असेल. नव्या स्कॉर्पियोच्या डिझाईन आणि फिचर्स मध्ये अनेक बदल पाहायला मिळणार आहेत.

कंपनीने बोलेरोचे अपडेट व्हर्जन ‘निओ’ नुकतेच सादर केले असून एन ४, एन ८, एन १० बाजारात दाखल झाल्या आहेत. एन १० च्या किमतीचा खुलासा लाँच करतेवेळीच केला गेला होता. नवी बोलेरो निओ १० साठी १० लाख ६९ हजार रुपये मोजावे लागणार असून पाच कलर ऑप्शन मध्ये ती उपलब्ध आहे.