फेसबुक, शाओमी, अमेझॉनची भारतात डिजिटल लोन मार्केटवर नजर

फेसबुक इंक, शाओमी कार्पो, अमेझॉन, गुगल या कंपन्या भारतात डिजिटल लोन मार्केट मध्ये उतरण्याच्या तयारीत असून २०२४ पर्यत देशाची डिजिटल लोन इंडस्ट्री १० खरब डॉलर्सवर जाईल असे संकेत मिळत आहेत. या कंपन्यांनी त्यांच्या या संदर्भातल्या योजनांची घोषणा अगोदरच केली आहे. भारतात वेगाने ऑनलाईन ट्रांझॅक्शन वाढत चालले आहे आणि त्यामुळे या कंपन्यांनी डिजिटल पेमेंट मार्केटवर लक्ष केंद्रित केले आहे.

एका रिपोर्ट नुसार २०२३ पर्यंत डिजिटल कर्ज ३५० अब्ज डॉलर्सचा पल्ला गाठेल. २०१९ पासून पुढच्या ५ वर्षात ते १० खरब डॉलर्सवर जाईल. फेसबुकने छोट्या व्यवसाय कर्जासाठी त्यांच्याकडे जाहिराती देणाऱ्या कर्जदाराना सहकार्य करणार असल्याचे जाहीर केले असून या प्रकारची योजना फेसबुक भारतात सर्वप्रथम राबवीत असल्याचे म्हटले आहे. या योजनेंतर्गत ५ ते ५० लाखापर्यंतचे कर्ज विना तारण दिले जाणार आहे. मात्र त्यासाठी व्याजदर १७ ते २० टक्के असू शकेल.

शाओमी इंडियाचे प्रमुख मनु जैन म्हणाले कंपनी लोन, क्रेडीट कार्ड, विमा उत्पादने संदर्भात ऑफर योजना आखत असून बड्या बँका व डिजिटल लेंडर स्टार्टअप्स बरोबर करार करत आहे. अमेझॉनने नुकतीच फायनान्शियल टेक्नोलॉजी स्टार्टअप स्मॉल केस टेक्नोलॉजीमध्ये गुंतवणूक केली असून कंपनीची वेल्थ मॅनेजमेंट क्षेत्रात ही पहिलीच गुंतवणूक आहे.

गुगल अगोदरपासूनच टाईम डिपॉझीट स्मॉल लेंडर्स बरोबर भागीदारी करत असून गुगल पे, डिजी गोल्ड, म्युच्युअल फंड माध्यमातून ही भागीदारी केली जात आहे. याशिवाय फेअरिंग कॅपिटल, प्रेमजी इन्व्हेस्ट, सेकीय कॅपिटल इंडिया, ब्लूम व्हेन्चर्स, बी नेक्स्ट सारख्या अनेक कंपन्या डिजिटल लोन मार्केट मध्ये उतरण्याची तयारी करत आहेत.