पुण्याने रचला नवा रेकॉर्ड! एका दिवसात तब्बल 2 लाख जणाचे लसीकरण


पुणे : कोरोना लसीकरण मोहिमेमध्ये पुणे जिल्ह्याने आज एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. पुणे जिल्ह्यात आज एका दिवसात तब्बल 2 लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्याचबरोबर जिल्ह्यात आतापर्यंत लसीकरण झालेला आकडा 80 लाखांच्या घरात गेला आहे. पुणे जिल्हा अशी कामगिरी करणारा देशातील एकमेव जिल्हा ठरला आहे. पुण्याच्या ग्रामीण भागात आज लसीकरणाने उच्चांक गाठला. जिल्हा परिषदेला सीएसआर फंडातून दीड लाख डोस मिळाले होते. त्यामुळे एका दिवसात लसीकरणाचा दोन लाखांचा टप्पा पार करणे शक्य झाल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी म्हटले आहे.

लसीकरणाने ऑगस्ट महिन्यात चौथ्यांदा एक लाखाचा आकडा ओलांडला आहे. याआधी मागील आठवड्याच्या गुरुवारी दिवसभरात एक लाख 15 हजार जणांचे लसीकरण करण्यात आले होते. राज्यात झालेल्या एकूण लसीकरणापैकी 20 टक्के लसीकरण हे एकट्या पुणे विभागात झाले आहे, त्यातही पुणे विभागातील जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक लसीकरण हे पुणे जिल्ह्यात झाले आहे.

कोरोना लसीकरणाच्या मोहीमेत एक महत्वाचा टप्पा पुणे शहरानेही गाठला आहे. पुण्यात 30 लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा टप्पा पूर्ण झाला आहे. पुणे शहरात कालपर्यंत 31 लाख 83 हजार 542 नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. काल एका दिवसात पुणे शहरात 64 हजार 646 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पुन्हा एकदा वाढल्याचे दिसत आहे. गेले दोन आठवडे आटोक्यात असलेल्या कोरोनाने या आठवड्यात पु्न्हा डोकेवर काढले आहे. गेल्या आठवड्यात कमी झालेल्या हॉटस्पॉट गावांची संख्या पुन्हा वाढली असून गेल्या आठवड्यात पुणे जिल्ह्यातील 95 गावे हॉटस्पॉट होती, त्यांची संख्या आता पुन्हा वाढून 103 वर गेली आहे. सध्या पुणे ग्रामीणमध्ये बाधित दर 3.6 टक्के आहे.