भारतीय रेल्वेत १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी, मिळेल दरमाह ९३ हजार पगार


कोरोना संकटामुळे आपल्यापैकी अनेकजणांनी आपला रोजगार गमावलेला असल्यामुळे अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. पण यासाठी कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. त्यामुळेच कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न माझा पेपरने सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना रोजगाराची गरज आहे, ते उमेदवार त्याठिकाणी अर्ज करु शकतील.

दरम्यान नोकरीसाठी इच्छुक असणार्‍या उमेदवारांसाठी आता आणखीन एक नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुम्ही पदवीधर आहात किंवा १२ वी पास आहात तर तुम्हाला रेल्वेत नोकरी मिळण्याची एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. कारण पश्चिम रेल्वेच्या ग्रुप ‘सी’ पदासाठी रेल्वे रिक्रूटमेंट सेलने भरती सुरु केली आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवार पश्चिम रेल्वेच्या http://rrc-wr.com या अधिकृत वेबसाइटवरुन ३ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करु शकतात. ग्रुप सीच्या विविध पदांसाठी स्पोर्ट्स कोट्याच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

ही भरती प्रक्रिया RRC पश्चिम रेल्वे स्पोर्ट्स कोट्यातून एकूण २१ पदांसाठी होणार आहे. ज्या माध्यमातून महिला आणि पुरुष दोघांनाही या पदासाठी अर्ज करत येणार आहेत. स्पोर्ट्स कोट्यातील ही भरती प्रक्रिया अनारक्षित असल्यामुळे OBC, SC, ST वर्गातील कोणत्याही उमेदवाराला भरती प्रक्रियेत आरक्षण मिळणार नाही. या भरती प्रक्रियेतील पे लेवल ४ आणि ५ पदांसाठी उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त युनिर्व्हसिटीमधून ग्रॅज्युएट असणे गरजेचे आहे. तर पे लेवल २ आणि ३ साठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून १२ वी पास असणे गरजेचे आहे. याशिवाय संबंधित खेळात विशेष अधिकृत प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

या नोकर भरतीसाठी उमेदवाराचे वय १८ ते २५ वयोगटातील असणे गरजेचे आहे. या स्पोर्ट्स कोट्यातील २१ पदांसाठी रेल्वेकडून चांगला पगार दिला जाणार आहे. यातील ५ पदांसाठी लेवल ४/५ साठी २५, ५०० ते ९२,३०० पर्यंत पगार दिला जाईल. तर १६ पदांसाठी लेवल २/३ साठी १९,००० ते ६९,१०० रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.