आयपीसी कलम १८८ अंतर्गत सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल


मुंबई – मुंबई पोलिसांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि ३० पेक्षा जास्त पक्ष कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राज्य सरकारने राज्यभरातील मंदिरे उघडण्यास परवानगी द्यावी, यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास या पार्श्वभूमीवरच सुधीर मुनगंटीवार व भाजप कार्यकर्ते दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिराबाहेर मोठ्यासंख्येने जमले होते, म्हणून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ठरवलेल्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याप्रकरणी आयपीसी कलम १८८ अंतर्गत गावदेवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत माहिती देताना गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामपियारे राजभर यांनी सांगितले की, भाजप कार्यकर्ते बाबुलनाथ मंदिराबाहेर निदर्शने करत असल्याची माहिती आम्हाला मिळाली आणि ३५ पेक्षा जास्त लोक जमले आहेत आणि मंदिरे पुन्हा उघडण्याची मागणी करत आहेत. म्हणून आम्ही घटनास्थळी गेलो आणि त्यांना तेथून निघण्याची विनंती केली.

मुनगंटीवार यांच्यासह भाजप पक्षाचे कार्यकर्ते सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास त्या ठिकाणाहून निघून गेले, त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी गावदेवी पोलीस ठाण्यात जाऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, आम्ही लवकरच गुन्हा दाखल केलेल्या लोकांना नोटिसा बजावण्यास सुरुवात करू, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामपियारे राजभर यांनी सांगितले.

कोरोना निर्बंधांमुळे बंद असलेली राज्यभरातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपने सोमवारी राज्यभरातील मंदिरांपुढे शंखनाद आंदोलन केले होते. या आंदोलनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही पाठिंबा दिला होता. पण आंदोलनात ते सहभागी झाले नव्हते. केवळ नोटांचा व मद्य दुकानदारांचा आवाज राज्य सरकारला ऐकू येतो. त्यामुळे राज्य सरकारला जागे करण्यासाठी शंखनाद करण्यात आल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. कोरोना निर्बंध शिथिलीकरणानंतर जनजीवन सुरळीत होऊ लागले. पण राज्यातील मंदिरे सुरू न झाल्यामुळे भाजपला रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागल्याचे सांगत पाटील यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले होते.