पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजप आमदाराचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश


कोलकाता – तृणमूल काँग्रेसची सत्ता पश्चिम बंगालमध्ये पुन्हा आल्यानंतर भाजपला एकापाठोपाठ एक आमदार सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत. सेनेटर हॉटेलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात भाजपचे बागदाचे आमदार विश्वजीत दास यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मंत्री पार्थ चटर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे इतर नेते या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी उपस्थित होते. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये आता भाजप आमदारांनी संख्या ७२ झाली आहे.

विष्णुपूरच्या भाजप आमदाराने सोमवारी पक्षाला सोडचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आज बागदाचे आमदार विश्वजीत दास यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमधील काही नेत्यांसोबत निवडणुकीपूर्वी विश्वजीत दास यांचा वाद झाला होता. विश्वजीत दास हे मुकुल रॉय यांचे समर्थक मानले जातात. निवडणुकीनंतर मुकुल रॉय यांनी घरवापसी केल्यानंतर विश्वजीत दास यांनीही तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सुडाचे राजकारण भाजप करत आहे. पश्चिम बंगालमधील नागरिकांच्या अधिकारावर केंद्रीय यंत्रणांचा वापर करून गदा आणत आहेत. जनतेच्या भल्यासाठी ममता बॅनर्जी यांना साथ देण्याची मी सर्व नेत्यांना विनंती करतो, असे विश्वजीत दास यांनी सांगितले.