5 दिवसांनंतर देशभरातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, तर 350 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली – काल दिवसभरात देशात पाच दिवसांनंतर 40 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर मृतांच्या आकड्यातही कमी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने आज जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 30,941 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 350 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर काल दिवसभरात 36,275 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

सलग पाच दिवस देशात 40 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत होती. अशातच आज दैनंदिन रुग्णवाढीत काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. काल दिवसभरात 40 हजारांहून कमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

एकूण तीन कोटी 27 लाख 68 हजार जणांना कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासूनच आतापर्यंत लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 38 हजार 560 बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 3 कोटी 19 लाख 59 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाखांहून अधिक आहे. एकूण 3 लाख 70 हजार रुग्णांवर अद्यापही उपचार सुरु आहेत.

काल महाराष्ट्रात 3,741 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 4 हजार 696 जण कोरोनामुक्त झाले आहे. आतापर्यंत राज्यात 62 लाख 68 हजार 112 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97. 02टक्के आहे. राज्यात काल (सोमवार) 52 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. तब्बल 45 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल (सोमवार) एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 51 हजार 834रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 12, 717 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.