आयपीएलमध्ये आता खेळणार आठ ऐवजी १० संघ; बीसीसीआयच्या तिजोरीत पडणार अतिरिक्त ५००० कोटींची भर


नवी दिल्ली – इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएलसाठी बीसीसीआय मोठी तयारी करत असून आयपीएलच्या पुढील हंगामापासून ८ ऐवजी १० संघ खेळणार आहेत. एका संघाची मूळ किंमत बीसीसीआयने सुमारे २ हजार कोटी रुपये ठेवली आहे. बीसीसीआयला अशा स्थितीत या २ संघांकडून सुमारे ५ हजार कोटी मिळू शकतात. ६० ऐवजी ७४ सामने पुढील हंगामापासून खेळवले जातील. १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये चालू हंगामातील उर्वरित ३१ सामने होणार आहेत.

या दोन नवीन संघाबाबत आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत चर्चा झाली. वृत्तसंस्था पीटीआयला बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, ७५ कोटी रुपये देऊन कोणतीही कंपनी बोली दस्तऐवज खरेदी करू शकते. पूर्वी २ नवीन संघांची मूळ किंमत १७०० कोटी रुपये मानली जात होती, परंतु आता मूळ किंमत २००० कोटी रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बोली प्रक्रिया जर ठरल्याप्रमाणे पार पडली, तर किमान ५००० कोटी रुपयांचा नफा बीसीसीआयला होईल, कारण अनेक कंपन्या बोली प्रक्रियेत रस दाखवत आहेत. बीसीसीआयला किमान ५००० कोटींची अपेक्षा आहे. आयपीएलच्या पुढील हंगामात ७४ सामने होतील आणि प्रत्येकासाठी ही फायदेशीर गोष्ट असल्याचेही या सूत्राने सांगितले.

अहमदाबाद, लखनऊ आणि पुणे या शहरांची नावे नवीन संघांसाठी समोर आली आहेत. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आणि लखनऊमधील एकाना स्टेडियम ही फ्रेंचायझींची निवड असू शकते, कारण या स्टेडियमची क्षमता अधिक आहे. अनेक व्यावसायिक कंपन्या फ्रेंचायझी खरेदी करण्याच्या शर्यतीत आहेत. अदानी ग्रुप, आरपीजी संजीव गोएंका, फार्मास्युटिकल कंपनी टोरेंट आणि एक बँक हे सर्व आयपीएलमध्ये त्यांच्या उपस्थितीसाठी प्रयत्न करत आहेत.