सुवर्णकन्या अवनी साठी महिन्द्राची खास एसयूव्ही

टोक्यो पॅरालीम्पिक २०२१ मध्ये भारताला १० मीटर एअर रायफल मध्ये पहिले सुवर्णपदक मिळवून देऊन पहिली भारतीय महिला खेळाडू बनलेल्या अवनी लेखरा हिच्या साठी एका खास एसयूव्हीची भेट दिली जाणार आहे. महिंद्र अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्र यांनी सोशल मीडियावर या संदर्भातली त्यांची इच्छा व्यक्त केली आहे.

आनंद म्हणतात, ‘महिंद्र समूह अवनीसाठी तसेच विकलांग लोकांसाठी खास नवी कस्टमाईज एसयुव्ही डिझाईन करेल आणि अशी पहिली गाडी अवनीला समर्पित करून तिला गिफ्ट दिली जाईल.’ अवनीने टोक्यो पॅरालीम्पिक मध्ये इतिहास रचला आहे. तिने १० मीटर एअर स्पर्धा एसएच १ मध्ये सुवर्ण पदक मिळविले आहे आणि २४६.६ अंक मिळवून जागतिक रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

आनंद महिंद्र यांच्या म्हणण्यानुसार एक आठवड्यापूर्वी दीपा अॅथलेटने ती टोक्यो मध्ये जश्या प्रकारची गाडी वापरते आहे, तशीच विकलांग खेळाडूंसाठी एक एसयूव्ही विकसित केली जावी असा सल्ला दिला होता. त्यानुसार आनंद यांनी त्याचे सहकारी व विकास प्रमुख वेलू यांना हे आव्हान स्वीकारा आणि प्रत्यक्षात आणा असे सुचविले आहे. या प्रकारे तयार झालेली पहिली कार अवनीला समर्पित आणि गिफ्ट करण्याची इच्छा आनंद यांनी व्यक्त केली आहे.

टोक्यो ऑलिम्पिक मध्ये भालाफेकीत देशाला एकमेव सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या निरज चोप्रा याला महिन्द्राची नवी एक्सयुव्ही ७०० भेट दिली गेली आहे. विशेष म्हणजे ही एक्सयुव्ही वेलू यांनीच विकसित केलेली आहे.