अफगाणी नाभिक, तालिबानी सत्तेमुळे भयभीत

अफगाणिस्थान मध्ये तालिबानने आता पूर्ण सत्ता काबीज केल्यामुळे संगीत, नृत्य, खेळ त्यातही विशेषत महिला खेळांवर अनेक बंधने आली आहेत. विशेष म्हणजे तालिबानी कब्ज्यामुळे अफगाणिस्थान मधील नाभिक समाजाचे भविष्य सुद्धा अधांतरी आणि अशाश्वत बनले आहे. याचे कारण म्हणजे २००१ मध्ये जेव्हा तालिबानी सत्ता अफगाणीस्थानात आली तेव्हा अनेक नाभिकांना जेलची हवा खावी लागली होती.

कट्टरपंथी इस्लामी तालिबानी विदेशी स्टाईलने केस कापून घेणे निषिद्ध मानतात. तालिबानी अफगाणिस्थानचा ताबा घेण्यापूर्वी तेथील युवक त्यावेळी गाजलेल्या टायटानिक चित्रपटातील हिरो लियोनार्दो कॅप्रीयातो सारखा हेअरकट करण्यात धन्यता मानत होते. तालिबानच्या धार्मिक बाब मंत्रालयाने काबुल मधील नाभिकांना विदेशी स्टाईलने ग्राहकाचा हेअरकट करून दिल्यास तुरुंगात टाकले जाईल असा इशारा दिला होताच पण विदेशी हेअरस्टाईल लोकप्रिय केल्याच्या आरोपावरून अनेक नाभिकांना तुरुंगात टाकले होते. त्यात बीटल्स कट सुद्धा सामील होता.

तालिबानने सर्वप्रथक युवा वर्गाला टार्गेट करून त्यांना जेल मध्ये नेऊन तेथे बंद केलेल्या नाभिकांकडून या युवकांचा चमनगोटा करायला लावला होता. २० वर्षाच्या मुक्त वातावरणानंतर पुन्हा एकदा तालिबानी राज आल्यामुळे नाभिक समाजात दहशत आहे. रॉयटरला दिलेल्या एका मुलाखतीत अहम्मद अमीन नुरी यांनी ‘ तालिबान राजवटीत आम्हाला काम राहिलेले नसल्याचे’ सांगितले. ते म्हणाले गेल्या वेळी आमचे काम कायद्याविरोधी ठरविले गेले होते. तालिबान राजवटीत पुरुषांना मेकअप आणि टॅट्यू गोंदवून घेण्यावर सुद्धा बंदी आहे. त्यामुळे ग्राहक नाहीत.