सचिन वाझेला खासगी रुग्णालयात उपचार करून घेण्याची परवानगी

विशेष एनआयए कोर्टाने सोमवारी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला खासगी रुग्णालयात उपचार करून घेण्याची परवानगी दिली. अंबानी यांच्या अँटेलिया इमारतीसमोर स्फोटकाने भरलेली जीप उभी करणे आणि व्यापारी मनसुख हिरेन याची हत्या या आरोपावरून सचिन वाझे न्यायालयीन कोठडीत आहे.

वाझे याला हृदयरोगाचा त्रास होत असून त्याने विशेष कोर्टात उपचारासाठी खासगी रुग्णालयात जाण्याची परवानगी मिळावी अशी याचिका दाखल केली होती. यापूर्वी त्याला जेजे रुग्णालयात नेले गेले होते तेव्हा त्याच्यावर बायपास शस्त्रक्रिया करावी लागेल आणि त्यासाठी रुग्णालयात दाखल करावे लागेल असा सल्ला दिला गेला होता. मात्र वाझे याने सरकारी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला होता. त्याऐवजी ठाणे येथील खासगी रुग्णालयात उपचार करून घेण्याची परवानगी मिळावी यासाठी याचिका दाखल केली होती.

वाझे याचे वकील सुदीप पासबोला यांनी वाझे याचे तीन मेडिकल रिपोर्ट न्यायालयात दाखल केले होते आणि त्याच्यावर त्वरित उपचार न झाल्यास त्याच्या मृत्यूचा धोका असल्याचे सांगितले होते. वाझे जिवंत राहिला नाही तर त्याच्या विरुध्दचा तपास निरुपयोगी ठरेल असेही प्रतिपादन त्यांनी केले होते. वाझेने यावर त्याला स्टेन स्वामी बनायचे नाही असे विधान केले होते.

एल्गार प्रकरणातील आरोपी स्टेन स्वामी यांना उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू आला होता. ते सुद्धा तळोजा जेल मध्ये न्यायालयीन कोठडीत होते आणि हायकोर्टाने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचा आदेश दिला होता.