१ सप्टेंबरपासून होणाऱ्या बदलांचा निश्चितपणे सामान्य माणसाच्या जीवनावर होणार परिणाम


नवी दिल्ली – देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असतानाच अन्य काही महत्त्वाच्या गोष्टींच्या किंमतीत पुढील महिन्याच्या १ तारखेपासून बदल होत आहेत. आधार-पॅन जोडणी अनिवार्य ते एलपीजी स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीत अपेक्षित वाढ या बदलांमध्ये समावेश आहे. सामान्य माणसाच्या जीवनावर या बदलांचा निश्चितपणे परिणाम होईल.

  • पॅनशी आधार लिंक करणे
    सर्वात प्रथम महत्वाचा बदल म्हणजे भारतीय स्टेट बँक च्या ग्राहकांनी त्यांचे पॅनकार्ड त्यांच्या आधारशी ३० सप्टेंबरपर्यंत लिंक करणे आवश्यक आहे. असे न केल्यास ग्राहकांचे विशिष्ट व्यवहार करणे बंद होतील. पॅन कार्ड एका दिवसात ५०,००० किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा करण्यासाठी अनिवार्य असल्यामुळे आयकर विभागाच्या वेबसाइटवर त्यांचे आधार आणि पॅन लिंक करणे आवश्यक आहे.
  • एलपीजी स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती
    दुसरा महत्वपूर्ण बदल म्हणजे एलपीजी स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीमध्ये सप्टेंबर महिन्यात वाढ होणार आहे. सलग दोन महिन्यांच्या किंमती वाढल्यानंतर पुन्हा एकदा वाढ होणार आहे. १८ ऑगस्ट रोजी एलपीजीच्या किंमतीत प्रति सिलिंडर २५ रुपयांनी वाढ करण्यात आली होती, तर जुलैमध्ये ती २५.५० रुपयांनी वाढवण्यात आली होती.
  • आधार-पीएफ लिंकिंग
    जर तुमचा यूएएन (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) आणि आधार कार्ड लिंक केले नसेल, तर तुमचा नियोक्ता तुमच्या भविष्य निधी (पीएफ) खात्यात कोणतेही पैसे सप्टेंबर महिन्यापासून जमा करू शकणार नाही. कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) सामाजिक सुरक्षा संहिता २०२० च्या कलम १४२ मध्ये याची अंमलबजावणी करण्यासाठी सुधारणा केली होती.
  • GSTR-1 फाइलिंगसाठी मार्गदर्शक तत्त्वे
    जीएसटीआर -१ भरण्यासाठी केंद्रीय जीएसटी नियमांचा नियम -५९ (६) सप्टेंबरपासून लागू होईल, असे वस्तू आणि सेवा कर नेटवर्कने (जीएसटीएन) म्हटले आहे. नियमानुसार, जीएसटीआर -३ बी फॉर्ममध्ये रिटर्न दाखल न केलेल्या कोणत्याही नोंदणीकृत व्यक्तीला जीएसटीआर -१ फॉर्म भरण्याची परवानगी दिली जाणार नाही.
  • चेक क्लिअरन्स
    रिझर्व्ह बँकेच्या पॉझिटिव्ह पे सिस्टीमचा उद्देश फसवणुकीच्या कोणत्याही कृत्याला आळा घालण्यासाठी जारीकर्त्याच्या तपशीलांची पडताळणी करण्यासाठी चेक क्लिअर करणे होते. १ जानेवारीपासून ही प्रणाली लागू झाली होती. त्याआधीच अनेक बँकांनी नवीन प्रणाली स्वीकारली आहे, ही प्रणाली अॅक्सिस बँक देखील १ सप्टेंबरपासून लागू करणार आहे.