ईडीची नोटीस म्हणजे विरोधक नेत्यांसाठी प्रेमपत्र – संजय राऊत


मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनाप्रमुख तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अनिल परब यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सूडाचे राजकारण होत असून शिवसेनेला नारायण राणेंच्या अटकेमुळे लक्ष्य केले जात असल्याचा आरोप सध्या होत आहे. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याच प्रकरणी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया नोंदवली आहे.

संजय राऊत यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले, मागील काही दिवसांपासून शिवसेनेच्या नेत्यांवर कारवाया सुरूच आहेत. ईडीची नोटीस आम्हाला आली, तरी आमच्या चेहऱ्यावरचे हास्य ढळणार नाही. ईडीचे शिवसेना हेच लक्ष्य आहे. पण त्याचा महाविकास आघाडी सरकारवर तसूभरही परिणाम होणार नाही, त्यांचे मनोधैर्य खचणार नाही. उलट वाढेलच. कायदा क्षेत्रातील अनिल परब हे जाणकार असल्यामुळे काय करायचे हे त्यांना माहित आहे.

यातून सूडाची भावना आणि बिनबुडाचे राजकारण सुरू आहे. सगळ्यांचे दिवस येतात, दिल्लीत आमचेही दिवस येतील, असा सूचक इशाराही संजय राऊतांनी यावेळी दिला आहे. तसेच कर नाही त्याला डर कशाला? आम्ही काहीही असेल तरी चौकशीला सामोरे जाऊ, असेही ते म्हणाले आहेत. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत पुढे म्हणाले, ईडी आणि भाजपची हातमिळवणी असल्यामुळे आधी त्याची चौकशी व्हायला हवी.

संजय राऊत यांनी काही वेळापूर्वीच माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी ते म्हणाले की, राजकीय नेत्यांसाठी ईडीची नोटिस म्हणजे डेथ वॉरंट नसून प्रेमपत्र आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर अशा प्रेमपत्रांची संख्या वाढली आहे. अनिल परबांना भाजप नेत्यांनी टार्गेट केले. पण, परब नोटिसला उत्तर देतील आणि ईडीला तपासात सहकार्य करतील, असेही राऊत म्हणाले. तसेच एकतर भाजपचा माणूस ईडीमध्ये डेस्क ऑफिसर आहे किंवा ईडीचा अधिकारी भाजपच्या कार्यालयात काम करत असल्याचा टोला राऊतांनी यावेळी लगावला.