सैनिक श्रद्धांजलीवरून बायडेन यांच्यावर टीकेची झोड

अफगाणिस्थान मधून अमेरिकन सैन्य माघारीच्या निर्णयावरून टीकेचे धनी बनलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षांवर, जो बायडेन यांच्यावर आता सैनिक श्रद्धांजली वरून पुन्हा टीकेचा भडीमार झाला आहे. काबुल विमानतळाबाहेर झालेल्या आत्मघाती स्फोटात शहीद झालेल्या १३ अमेरिकन नौसैनिकाचे मृतदेह रविवारी अमेरिकेत आणले आणि त्यांना डेलवेअर एअरफोर्स बेसवर सलामी आणि श्रद्धांजली दिली गेली. यावेळी अध्यक्ष बायडेन, पत्नी जिल सह उपस्थित होते. त्यांनी सैनिकांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि सैनिकांना श्रद्धांजली दिली. मात्र लगेच त्यांनी हातातील घड्याळावर नजर टाकली. हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आणि बायडेन यांच्या या कृतीवर टीकेची झोड उठली.

अनेकांनी संतप्त होऊन यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एक युजरने, ‘प्रेसिडेंट या पेक्षाही कुठल्या महत्वाच्या कामाला जायची घाई आहे काय’ असा प्रश्न विचारला असून अन्य एकाने’ दुपारच्या वामकुक्षीची वेळ झाली, किती वेळ वाया चाललाय’ असे वक्तव्य केले आहे. अन्य एकाने अध्यक्षांना बोअर होतेय असे म्हटले आहे. द सनच्या रिपोर्टनुसार बायडेन यांचा हा फोटो नागरिकांना संतप्त करून गेला आहे. काबुल विमानतळाबाहेर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी इसीसने स्वीकारली असून या स्फोटात १७२ हून अधिक मृत्यू झाले होते. यात अमेरिकेचे १३ सैनिक प्राणास मुकले होते.