या देशातील शवपेट्यांची शान आगळी

शिल्पकला, चित्रकला, वास्तू रचना, लाकूड कला अश्या ६४ कला आपल्याला ज्ञात आहेत. जगभरातील विविध देश अश्या कोणत्या ना कोणत्या कलांसाठी प्रसिद्ध आहेत. प्रत्येक देशाची संस्कृती, परंपरा, वारसा त्यातून दिसत असतो. आफ्रिकेतील घाना हा सुंदर देश मात्र अजब कलेसाठी विशेष प्रसिध्द आहे. येथे विविध आकाराच्या अगदी युनिक म्हणता येतील अश्या शवपेट्या बनविल्या जातात आणि जगभरातून त्यांना मागणी आहे. विशेष म्हणजे १९५० पासून अश्या शवपेट्या या देशाची परंपरा बनून राहिल्या आहेत.

येथे बनणाऱ्या शवपेट्या माणसाचा व्यवसाय, त्याचे समाजातील स्टेटस, आवड, शेवटची इच्छा याला अनुसरून बनविल्या जातात. याची सुरवात झाली १९५१ मध्ये. ९१ वर्षाची एक आजी रोज डोक्यावरून विमान उडताना पाहत असे आणि तिला एकदा विमानात बसायची इच्छा होती. ती पूर्ण झाली नाही म्हणून तिच्या सुतार नातवाने तिच्यासाठी विमानाच्या आकाराची शवपेटी बनवून त्यासकट तिचे दफन करून तिची अंतिम इच्छा पूर्ण केली आणि तेव्हापासून अश्या विचित्र शवपेट्या बनविण्याची परंपरा सुरु झाली असे सांगितले जाते.

याची प्रथम सुरवात केली मच्छिमार लोकांनी. त्यांनी माशाच्या आकाराच्या शवपेट्या वापरायला सुरवात केली. अति श्रीमंत व्यवसायिक असतील तर मर्सिडीज कारच्या आकाराची शवपेटी बनविली जाऊ लागली. त्यानंतर परदेशातून सुद्धा या शवपेट्यांना मागणी येऊ लागली. आणि त्यातून म्हणाल त्या आकाराच्या म्हणजे कोका कोला बाटली, बूट, खेकडा, बैल, शेळ्या मेंढ्या, अश्या वाटेल त्या आकाराच्या शवपेट्या आज बनविल्या जातात. या फॅन्सी शवपेट्या घाना मध्ये ७० -८० हजारात विकल्या जातात तर परदेशात त्यासाठी तीन ते पाच लाख अशी किंमत मिळते असेही समजते.