मायापूर येथे बनतेय जगातील सर्वात मोठे श्रीकृष्ण मंदिर

आज जन्माष्टमी. भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस. देशात हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. भारतात आणि विदेशात सुद्धा अनेक कृष्णमंदिरे आहेत. मात्र जगातील सर्वात मोठे कृष्णमंदिर प.बंगालच्या मायापूर येथे उभारले जात असून इस्कॉन तर्फे त्याची उभारणी सुरु आहे. मायापूर हे इस्कॉनचे मुख्यालय सुद्धा आहे. कृष्णभक्त चैतन्य महाप्रभू यांची मायापूर ही जन्मस्थळी आहे.

हे कृष्ण मंदिर ६ लाख चौरस फुट परिसरात उभारले जात असून त्याचे ८० टक्के काम २०२३ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर ते भाविकांसाठी उघडले जाईल. हे मंदिर सात मजली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या वाहन उद्योगातील अग्रणी कंपनी फोर्डचे वंशज आल्फ्रेड फोर्ड इस्कॉनचे अध्यक्ष आहेत. त्यांना आता अंबरीश दास या नावाने ओळखले जाते. अंबरीश दास यांनी या मंदिरासाठी पुढाकार घेतला असून ८०० कोटी रुपये खर्चून हे भव्य मंदिर बांधले जात आहे.

हे मंदिर अनन्यसाधारण किंवा एकमेवाद्वितीय ठरेल. या मंदिराची उभारणी १२ एकर जागेत होत असून मंदिरापुढे ४५ एकराचा बगीचा आहे. पहिल्या मजल्याचे नामकरण पुजारी मजला असून या मजल्याचा आकार दीड एकर आहे. कीर्तन हॉल मध्ये एकावेळी १० हजार भाविक भजन करू शकणार आहेत. मंदिराची उंची ३५० फुट आहे आणि घुमट १७७ मीटर उंचीचा आहे. जगातील हे सर्वात मोठे वैदिक मंदिर आहे. अध्यात्म आणि विज्ञान या दोन्हीवर या मंदिराच्या उभारणीत भर दिला गेला आहे. मंदिरासाठी राजस्थान, व्हिएतनाम, इटली, फ्रांस, स्पेन येथून संगमरवर आणले जात आहे.

या मंदिरात तारामंडळ असेल. प्लॅनेटोरीयम असलेले हे जगातील एकमेव मंदिर आहे असेही समजते. मायापूर येथे वर्षाला साधारण ६० लाख भाविक भेट देतात. मंदिर पूर्ण झाल्यावर ही संख्या ६ कोटींवर जाईल असा अंदाज आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या गावाला अगोदरच हेरिटेज सिटी म्हणून घोषित केले आहे.