कुप्रसिद्ध दरोडेखोराला ठार करणाऱ्या पिस्तुलाचा ४४ कोटींना लिलाव

अमेरिकेत वाईल्ड वेस्ट काळात कुप्रसिद्ध झालेल्या दरोडेखोर बिली द कीड याला ठार करण्यासाठी वापरल्या गेलेल्या पिस्तुलाला लिलावात ६.०३ दशलक्ष डॉलर्स म्हणजे ४४,३१,८५,७०५ रुपयांची विक्रमी किंमत मिळाले. ते लिलावात विकले गेलेले जगातील सर्वात महाग पिस्तुल ठरले आहे. बोनहॅम्स ऑक्शनने या पिस्तुलासाठी २२ कोटी पर्यंत किंमत येईल असा अंदाज केला होता. शेरीफ पॅट गॅरॅश यांच्या मालकीचे हे सिंगल अॅक्शन रिव्होल्वर इतिहासिक मानले जाते. वाईल्ड वेस्टच्या काळातील कथा आणि सर्वात महत्वाचा अवशेष म्हणून त्याकडे पाहिले जाते.

१४ जुलै १८८१ मध्ये बिली द कीड या कुख्यात दरोडेखोराला शेरीफ गॅरॅश याने या पिस्तुलातून छातीत गोळी घालून ठार केले होते. त्यावेळी बिली अवघा २१ वर्षाचा होता. हे पिस्तुल आजही उत्तम अवस्थेत असून त्याची पकड अजूनही पक्की आहे. याच लिलावात बिली द कीडने ज्या शेरीफच्या हातातून पिस्तुल खेचून घेऊन त्या शेरीफला ठार केले होते त्या पिस्तुलाचा सुद्धा लिलाव करण्यात आला. त्या पिस्तुलाला ७.२० कोटींची बोली मिळाली.

जगातील सर्वात महाग बंदूक म्हणून या पूर्वीचे रेकॉर्ड फ्लिंटलॉक सॅडल पिस्तुलाची नोंद झाली होती. क्रांती युद्ध काळात जॉर्ज वॉशिंग्टन यांच्याजवळ हे पिस्तुल होते. त्यांना त्यांच्या मित्राने ते भेट दिले होते. २००२ मध्ये क्रिस्तीने १४.५५ कोटींना या पिस्तुलाचा लिलाव केला होता.