10 हजार रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करून सुरू करा हे व्यवसाय (भाग-2)


आज मोठ्या प्रमाणात लोक दररोजच्या नोकरीला कंटाळलेले पाहायला मिळतात. प्रत्येकाच्या मनात नोकरीसोडून केव्हातरी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना आलेली असते. मात्र नेमका व्यवसाय कोणता करावा आणि भांडवल कुठून आणावे हा प्रश्न निर्माण होत असतो. याआधीच्या भागात अगदी कमी खर्चात सुरू करता येणारे ट्रॅव्हल एजन्सी आणि मोबाईल रिचार्ज शॉप या व्यवसायांबद्दल आम्ही तुम्हाला माहिती दिली होती. आज अशाच काही व्यवसायांची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, जे व्यवसाय अगदी कमी खर्चात सुरू करता येतात.

नाश्ता आणि चहाचे दुकान –

आपण आपल्या भागात अनेक ठिकाणी नाश्ता आणि चहाच्या दुकानावर प्रचंड गर्दी पाहत असतो. दुपार असो अथवा संध्याकाळ लोकांची दुकानात विविध पदार्थ खाण्यासाठी रांगच लागलेली असते. चहाच्या दुकानापुढे तर प्रचंड गर्दी आपण दररोजच पाहतो. हा व्यवसाय सुरू करणे कधीही फायदेशीर ठरते. कारण खाद्यपदार्थ, नाश्ता किंवा चहा या गोष्टींची दुकाने मोठ्याप्रमाणात चालतात. असे दुकान सुरू करण्यासाठी जास्त गुंतवणूक करण्याची देखील गरज नसते. एखादे छोटेशी दुकान 5 हजार रूपयांपर्यंत भाड्याने घेऊन याची सुरूवात करता येते. यासाठी तुम्हाला दुकानाचा परवाना काढवा लागले. जुन्या खुर्च्या आणि टेबल घेऊन देखील काम होऊ शकते. तसेच तुमचे उर्वरित बजेट सामानासाठी वापरू शकता. त्यामुळे अगदी 10 हजार रुपयांपेक्षा कमी खर्चात कधीही आणि कोठेही चालू शकणारे नाश्ता अथवा चहाचे दुकान सुरू करणे ही चांगली कल्पना ठरू शकते.

ट्यूशन सेंटर –

सर्वात कमी खर्चात सुरू करायचा व्यवसाय म्हणजे ट्यूशन सेंटर अर्थात क्लासेस. हा व्यवसाय अगदी शुन्य रुपयांमध्ये देखील सुरू करता येतो. अनेक ट्यूशन सेंटर हे स्वतःच्याच घरात सुरू केलेले आपण अनेकवेळा पाहतो. त्यामुळे घरातच ट्यूशन सेंटर सुरू केल्याने भाडे आणि इतर वस्तूंचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचतो. केवळ यासाठी खर्च लागतो तो म्हणजे जाहिरातीचा. सोशल मीडियाद्वारे देखील ट्यूशनची जाहिरात करता येते. याशिवाय आपल्या आजुबाजूच्या परिसरात ही माहिती लोकापर्यंत सहज पोहचते. तसेच, जवळच्या शाळांमध्ये जाऊन देखील तुम्ही जाहिरात करू शकता. त्यामुळे अगदी शुन्य रुपयांमध्ये तुम्ही हा व्यवसाय सहज सुरू करू शकता.

Leave a Comment