शिवसेनेने वैयक्तिक टीका बंद केली नाही, तर मीही प्रहार करणार; नारायण राणे


कणकवली : माझी मुले ही शिकली सवरलेली असून ते हुशार आहेत, माझे त्यांच्यावर नियंत्रण आहे. माझ्या मुलांवर टीका करणाऱ्यांनी सर्वात आधी आपल्या मुलांनी काय पराक्रम करुन ठेवले आहेत ते पहावे असे, म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर पलटवार केला आहे. त्याचबरोबर आपल्याला बोलायला संजय राऊतांनी प्रवृत्त करु नये, अन्यथा मोठ्या गोष्टी बाहेर येतील, असा इशाराही त्यांनी दिला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे पुढे म्हणाले की, माझे माझ्या मुलांवर नियंत्रण असून त्यांच्या हातून कोणतीही वाईट गोष्ट घडणार नाही. त्याआधी आपल्या मुलांनी काय पराक्रम करुन ठेवले आहे ते पहावे. ते कोणाला भेटतात, काय करतात, कोणत्या केसेसमध्ये त्यांची नावे आहेत याची चौकशी करावी. जर शिवसेनेने माझ्यावर वैयक्तिक टीका करणे बंद केले नाही, तर मीही प्रहार करणार. कोणाचा मुलगा कोणत्या केसमध्ये अडकला आहे हे बाहेर काढेण.

आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कोकणातील जनआशीर्वाद यात्रेचा शेवटचा दिवस असून त्यांनी त्यानिमित्ताने कणकवली येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी नारायण राणेंनी शिवसेनेवर आणि संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, आपले संदुक संजय राऊतांनी बाहेर काढावे, त्यांना कोण विचारत आहे. ते आपल्या निराशेपोटी असे बोलत आहेत. ते शिवसेनेची वाट लावण्यासाठीच बोलतात. शिवसेनेची वाट संजय राऊतांच्यामुळेच लागली.

लसीकरणासाठी टेंडर काढण्यात आले आणि 12 टक्के कमिशन द्या, अशी मागणी राज्य सरकारने केल्याचा आरोप राणेंनी केली. या सगळ्या गोष्टींची चौकशी केंद्र सरकारकडून करण्यात येणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.आपलाही हातभार शिवसेनेच्या घडणीत असल्याचे नारायण राणेंनी सांगितले. ते म्हणाले की, बाळासाहेबांच्या जीवाला ज्यावेळी धोका होता, त्यावेळी त्यांनी मला फोन केला. मी त्यांच्यासोबत सावलीसारखा राहिलो. मिळेत ते खाऊन रात्री काढल्या. रात्रभर मातोश्री बाहेर पहारा देत बसायचो.

नारायण राणे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना म्हणाले की, अजित पवार हे अज्ञानी असून पहिला आपल्या खात्याकडे त्यांनी पहावे. एका रात्रीतून आपल्यावरील केस कशा कमी करायच्या हे अजित पवारांकडून शिकण्यासारखे आहे.