10 हजार रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करून सुरू करा हे व्यवसाय


एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज भासत असते. भांडवल जमा करणे, निधी उभा करणे ही व्यवसायासाठी सर्वात अवघड गोष्ट असते. अपुऱ्या भांडवलामुळे अनेकवेळा एका चांगल्या उद्योगाची कल्पना धुळीस मिळते, अथवा पैसेच नसल्याने ती कल्पना सत्यात उतरत नाही.

एक चांगली कल्पना, एक मोठी कंपनी तयार करू शकते. एक मोठी कंपनी लोक जोडते आणि ती लोक त्या कंपनीला बाजारपेठे आपले स्थान निर्माण करण्यासाठी मदत करत असतात. आज जगात सर्वात यशस्वी उद्योजक असलेले मार्क झुकेरबर्क, बिल गेटस्, एल़ॉन मस्क या सारख्या उद्योगपतींकडे सुरूवातीला काहीही नव्हते. मात्र त्यांच्याकडे केवळ एक चांगली कल्पना होते.फेसबूक हे हॉवर्डच्या एका छोट्या रूममध्ये अगदी कमी खर्चात सुरू झाले होते. बिल गेटस् यांनी देखील कॉलेज सोडल्यानंतर दोन वर्षांनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली. याचाच अर्थ जर तुम्ही कमी खर्चात योग्य योजना आखुन व्यवसायाची सुरूवात केली, तर ते नक्कीच फायदेशीर ठरते व तुम्हाला योग्य तो परतावा देखील मिळतो.

वॉल्ट डिझनी म्हणतात, ‘जर तुम्ही स्वप्न पाहू शकता, तर तुम्ही ते साकार देखील करू शकता.’ त्यामुळे जर तुम्ही ही कमी खर्चात व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असला तर आम्ही तुमच्यासाठी असेच काही व्यवसाय घेऊन आलो आहोत, जे केवळ कमीत कमी 10 हजार रूपयांमध्ये सुरू करता येतील.
ट्रॅव्हल एजन्सी –

मागील दशकभरात भारतातील पर्यटन व्यवसाय झपाट्याने वाढला आहे. लोकांच्या आवडीनिवडी, फिरण्याच्या, जग बघण्याच्या सवयी बदलू लागल्या आहेत. त्यामुळे योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. तुम्ही ट्रव्हॅल एजन्सी घरी बसून देखील सुरू करू शकता. त्यामुळे तुमच्या ऑफिसच्या जागेचा, इतर खर्चांचा प्रश्न देखील सुटू शकतो. मात्र यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या ट्रॅव्हल एजन्सीशी भागीदारी (टाय-अप) करावा लागेल. ज्यामुळे तुम्ही त्या एजन्सीचे एआरसी, सीएलआयए आणि आयएटीए नबंर वापरू शकता. तुम्ही त्या एजन्सीसाठी ग्राहक मिळवून देऊ शकता, त्यांचे बुकिंग करू शकता. यातून तुम्हाला देखील चांगले कमीशन मिळू शकते. यासाठी होस्ट एजन्सी जास्तीत जास्त 10 हजार रुपये घेतात.
मोबाईल रिचार्ज शॉप –

सध्या ऑनलाईन पध्दतीने रिचार्ज करता येत असले तरीही, आजही भारतातील अनेकजण दुकानामध्ये जाऊन रिचार्ज करताना पाहायला मिळतात. त्यामुळे कमी खर्चात हा उद्योग जास्त नफा करून देऊ शकतो. यासाठी भाड्याने दुकान घेण्याची आवश्यकता आहे. तसेच, त्या भागात नेटवर्क देणाऱ्या कंपन्या व्होडाफोन, आयडिया, जिओ, एअरटेल इत्यादींबरोबर भागीदारीकरून (टाय-अप) त्यांचे कमीशन ठरवून घेता येते. जेवढा नफा तुम्ही मिळवाल त्यातील त्यांची ठरलेली भागिदारी त्यांना द्यावी लागत असते. जर तुम्ही छोटे दुकान घेऊन हा उद्योग सुरू करण्याचा विचार केला तर त्याचा खर्च नक्कीच 10 हजार रुपयांपेक्षा कमी येऊ शकतो.

Leave a Comment