जगातील महागडे चीज बनते गाढवीच्या दुधापासून


पौष्टिक, शरीराला बळ देणारे चीज जगभर मोठ्या आवडीने खाल्ले जाते आणि त्यामुळे त्याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होते. पिझा, पास्ता, सँडविचेस अश्या अनेक पदार्थात चीजचा सढळ हाताने वापर केला जातो आणि त्यामुळे पदार्थाला खास चव येते. चीज गाय, म्हैस, बकरीच्या दुधापासून बनविले जाते आणि त्यासाठी वेगवेगळी किंमत आकारली जाते. जगात सर्वाधिक महाग म्हणजे किलोला ७८ हजार रुपये भाव असलेले चीजही बाजारात आहे मात्र ते बनते गाढवीच्या दुधापासून.


युरोपच्या सर्बियाचे रहिवासी स्लोबोदान सिमिक हे चीज बनवितात तेही सर्बियाच्या नैसर्गिक अभयारण्यात असलेल्या त्यांच्या पाळीव गाढवांपासून. त्यांच्याकडे ३०० गाढवी आहेत. हे चीज फ्लेवर्ड आहे आणि खूपच टेस्टी सुद्धा. सिमिक सांगतात, हे चीज चवीला उत्तम आणि तब्येतीसाठी अतिशय उपयुक्त, पौष्टिक आहे. गाढवीच्या दुधात आईच्या दुधाचे सर्व गुण आहेत. त्यामुळे हे दुध नवजात बालकाला बिनघोर पाजता येते. हा निसर्गाचा एक चमत्कारच आहे. हे चीज शक्तिदायी आहेच पण दमा, ब्रोन्कायटीस सारख्या रोगात फायदेशीर ठरते. या चीजला पुले असे नाव आहे. २५ लिटर दुधापासून एक किलो चीज बनते. तेच नेहमीचे चीज ९ लिटर दुधापासून १ किलो बनते.


सिमिक सांगतात यापूर्वी गाढविणीचे दुध याप्रकारे कुणी वापरले नसावे. या दुधापासून चीज बनविण्यात सुरवातीला समस्या आल्या कारण या दुधात दुधाला दह्याच्या घट्टपणा देण्यासठी जे कॅसिन लागते ते नसते. मात्र त्यांच्या एका मित्राने गाढवीच्या दुधात थोडे बकरीचे दुध मिसळून चीज बनविण्याचा सल्ला दिला आणि तो योग्य ठरला. सिमिक सांगतात हे चीज महाग असण्यामागे मुख्य कारण म्हणजे एक गाढवी एका दिवसात १ लिटर सुद्धा दुध देत नाही. एकावेळी साधारण २० गाढवीच दुध देतात. यामुळे चीज कमी प्रमाणात बनते. एक गाय एका दिवसात ४० लिटर पर्यंत दुध देते त्यामुळे त्यापासून अधिक चीज बनू शकते.


गाढवीच्या दुधापासून सिमिक वर्षाला ६ ते १५ किलो इतकेच चीज बनवू शकतात आणि उत्पादन कमी त्यामुळे त्याची किंमत अधिक हे सरळ गणित आहे. या चीजला प्रामुख्याने परदेशी ग्राहक आणि पर्यटक यांच्याकडून मागणी आहे. सर्बियाचा प्रसिद्ध टेनिसपटू नोकाव जोकोविच याने त्याच्या रेस्टॉरंट चेनसाठी वर्षभराचे चीज खरेदी केल्याचे सांगितले जाते. शेवटी त्याच्या मायभूमीत तयार झालेले हे चीज आहे ना!

Leave a Comment