चिंतेत भर! काल दिवसभरात ४६ हजाराहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद


नवी दिल्ली – देशावर कोरोनाचे दुष्ट संकट पुन्हा एकदा घोंगावत असल्याचे चित्र पुन्हा दिसू लागले आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत मागच्या काही दिवसांपासून वाढ होत असल्याचे दिसत आहे. कोरोना रुग्णवाढीचा दर हा केरळमध्ये सर्वाधिक असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेत सरकारने उपाययोजना केल्या आहेत. लसीकरण मोहीम वेगाने राबवली जात आहे. शुक्रवारी लसीकरणाने ६० कोटींचा टप्पा गाठला.

पण कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तरी नागरिकांना नियम पाळण्याची विनंती केली जात. त्याचबरोबर अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. दरम्यान काल दिवसभरात ४६ हजार ७५९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ३१ हजार ३७४ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर काल एका दिवसात ५०९ जणांचा मृत्यू झाला आहे.

देशातील आतापर्यंत ३ कोटी २६ लाख ४९ हजार ९४७ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ३ कोटी १८ लाख ५२ हजार ८०२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात ३ लाख ५९ हजार ७७५ सक्रिय रुग्ण आहेत. देशात आतापर्यंत कोरोनामुळे ४ लाख ३७ हजार ३७० जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ६२ कोटी २९ लाख ८९ हजार १३४ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. काल दिवसभरात १ कोटी ३ लाख ३५ हजार २९० जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

आतापर्यंत देशात कोरोनावर मात करण्यासाठी सहा लसींना परवानगी देण्यात आली आहे. यात सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, रशियाची स्पुटनिक व्ही, झायकोव्ह-डी, अमेरिकेची मॉडर्ना आणि जॉन्सन जॉन्सनच्या सिंगल डोस असलेल्या लसींची समावेश आहे.