दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा ‘या’ तारखेला होणार सुरू


मुंबई : यंदाच्या वर्षी देखील दहावी आणि बारावीच्या परीक्षा कोरोनामुळे रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर दहावी आणि बारावीचा निकाल विशेष मूल्यांकन पद्धतीने लावण्यात आला. पण या दरम्यान उत्तीर्ण न होऊ शकलेले आणि ATKT साठी पात्र असलेले विद्यार्थी आता पुन्हा परीक्षा देऊ शकणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून या पुरवणी परीक्षा सुरु होण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. याबद्दल ट्विट करून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.

ही परीक्षा ज्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होऊ शकला नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा देण्यासाठी पुरवणी परीक्षेचा अर्ज भरला आहे अशा विद्यार्थ्यांना देता येणार आहे. यासाठी दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. तसेच त्या आधी होणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार येत्या 22 सप्टेंबरपासून 8 ऑक्टोबर या दरम्यान दहावीची पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे.


तर 16 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर या कालावधीत बारावीची पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच 16 सप्टेंबरपासून 8 ऑक्टोबरपर्यंत बारावीच्या व्यावसायिक अभयसक्रमाची पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

21 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या दरम्यान दहावीची तोंडी परीक्षा आणि पात्याक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच 15 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या दरम्यान बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.