संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील काळात येणारे महत्त्वाचे सण-उत्सव साधेपणाने साजरे करा – अजित पवार


पुणे : राज्यातील निर्बंध कमी केल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत असल्याचे दिसून येत आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुढील काळात येणारे दहीहंडी, गणेशोत्सव व अन्य सर्व धर्मियांचे महत्त्वाचे सण-उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले. तसेच शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात येणार आहे.

पुणे विधान भवनाच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे, खासदार वंदना चव्हाण, आमदार सुनील कांबळे, आमदार राहुल कुल, आमदार चेतन तुपे, आमदार संजय जगताप, आमदार भिमराव तापकीर तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पीएमआरडीएचे व्यवस्थपकीय संचालक सुहास दिवसे, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहीया, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे आदींसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मागील आठवड्यात पुणे जिल्ह्याचा बाधित रुग्ण संख्येचा दर 3.1 टक्के पर्यंत कमी झाला आहे त्यामध्ये पुणे मनपा 2.8 टक्के, पिंपरी चिंचवड मनपा चा 2.9 टक्के व पुणे ग्रामीण चा 3.6 टक्के होता. पुणे ग्रामीणमध्ये धडक सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत 3 लाख 30 हजार 674 नमुना तपासणी करण्यात आली आहे. ग्रामीण भागात टेस्टींगचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. ऑक्सिजन प्रणाली व पीएसए प्लॅन्टबाबत संबंधीत अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलेले आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांकरीता ऑक्सिजन विरहीत बेड्स, ऑक्सिजन बेड्स, आय सी यु बेड्स, व्हेंटीलेटर्स आदींचे नियोजन करण्यात आले आहे.

तिसरी लाट येण्यापूर्वी जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. प्रशासनाने जिल्ह्यात नियमाप्रमाणेच लसीचे वाटप करावे. उद्योग क्षेत्रासह अन्य क्षेत्रांकडूनही जास्तीत जास्त लस उपलब्ध करण्यात येत आहे. पुढील महिन्यात जास्त लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. विशेष गटातील औद्योगीक क्षेत्र, दिव्यांग, परदेशी शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, गरोदर माता, बेड रिडन नागरिक, तृतीय पंथी आदींचे लसीकरण सुरु आहे.

तसेच शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात येणार आहे. लसीकरण झालेल्या नागरिकांपैकी 0.16 टक्के इतके नागरिक कोरोनाबाधीत आढळून आले आहेत त्यामुळे नागरिकांनी गाफील न राहता जास्तीत जास्त काळजी घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे, खासदार वंदना चव्हाण, तसेच अन्य लोकप्रतिनिधींनीही महत्त्वाच्या सूचना केल्या.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर, प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, नागरिकांची नमुना तपासणी, बाधित रुग्ण, रुग्णालयीन व्यवस्थापन, लसीकरण सद्यस्थिती, म्युकरमायकोसिसचा रुग्णदर, मृत्युदर, तिसऱ्या लाटेच्या तयारीच्या दृष्टीने ऑक्सिजन प्लांटची सद्यस्थिती बाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार व पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण स्थितीबाबत व उपाययोजनेबाबत माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.