जिथे दिसेल तिथे संजय राऊतांचा करेक्ट कार्यक्रम करू – निलेश राणे


सिंधुदुर्ग: राणे पिता-पुत्र आणि शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या दरम्यान सुरू असलेले शाब्दिक युद्ध अद्याप शमलेले नाही. भाजप नेते प्रमोद जठार यांच्यापाठोपाठ भाजप नेते निलेश राणे यांनीही राऊत यांचा जिथे दिसेल तिथे करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचा इशारा दिला आहे.

टीव्ही9 मराठीशी बोलताना निलेश राणे यांनी हा धमकी वजा इशारा दिला. नाशिकमध्ये बोलताना संजय राऊत यांनी अजून एखादा करेक्ट कार्यक्रम करू असा इशारा दिला होता. त्यावर पलटवार करताना करेक्ट कार्यक्रम म्हणजे काय? असा सवाल करतानाच संजय राऊत बोगस माणूस आहे. आम्ही जिथे दिसेल तिथं संजय राऊतांचा कार्यक्रम करू, असा इशारा निलेश राणे यांनी दिला.

आम्ही शिवसेनेला भीक घालत नाही. आम्ही जन आशीर्वाद यात्रा पूर्ण करणारच, असा दावाही त्यांनी केला. आचार-विचार शिवसेनेकडे राहिले नाहीत, केवळ शिवसेना आडवा-आडवीची कामे करते. त्यांना आम्ही काडीची किंमत देत नाही. एकदा आमच्या गर्दीत संजय राऊत यांनी उभ रहावे आणि मग साहेबांचे विचार काय आहे, ते पहावे असे थेट आव्हानही त्यांनी दिले. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी नारायण राणे यांची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता, याची पुष्टी देखील त्यांनी केली.

केंद्रीय सुक्ष्म, लघु, उद्योग मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. त्यावरूनही निलेश राणे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. राणेंना अटक करायला सगळी यंत्रणा कामाला लागली. पण काही करू शकले नाहीत. एक दिवस तरी त्यांना ठेवायचं होते, असे ते म्हणाले.