कोकण रेल्वेत अभियांत्रिकी पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी


कोरोना संकटामुळे आपल्यापैकी अनेकजणांनी आपला रोजगार गमावलेला असल्यामुळे अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. पण यासाठी कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. त्यामुळेच कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न माझा पेपरने सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना रोजगाराची गरज आहे, ते उमेदवार त्याठिकाणी अर्ज करु शकतील.

दरम्यान नोकरीसाठी इच्छुक असणार्‍या उमेदवारांसाठी आता आणखीन एक नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वेमध्ये अभियांत्रिकी पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. टेक्निकल असिस्टंट पदासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) अर्ज मागवले आहेत. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून जम्मू आणि काश्मीरमध्ये उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (यूएसबीआरएल) योजनेसाठी कॉन्ट्रॅक्टवर आधारित उमेदवारांची भरती केली जाणार आहे.

रेल्वेच्या नोटिफिकेशननुसार सिनिअर टेक्निकल असिस्टंट(सिव्हिल)च्या एकूण रिक्त पदांची संख्या ७ आहे. यामध्ये ओबीसी – ५ आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी दोन जागा आहेत. तर, ज्युनिअर टेक्निकल असिस्टंटमध्ये (सिव्हिल)ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी पाच जागा आणि एसटी साठी दोन जागा आहेत.

सिनिअर टेक्निकल असिस्टंट पदावर निवड झालेल्या उमेदवारास दरमहा ३५ हजार रुपये वेतन, तर ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट पदावर निवड झालेल्यांना ३० हजार रुपये दरमाह वेतन दिले जाणार आहे.

सिनिअर टेक्निकल असिस्टंट पदासाठी उमेदवारांचे वय १ सप्टेंबर २०२१ रोजी जास्तीजास्त ३० वर्षे, तर ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट पदासाठी २५ वर्षे वयोमर्यादा आहे. एससी, एसटी आणि ओबीसी उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या पदाच्या भरतीसाठी उमेदवारांकडे AICTE द्वारे मान्यताप्राप्त विद्यापिठातून ६० टक्के गुणांसह अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवारांना कामाचा अनुभव देखील आवश्यक आहे. कोकण रेल्वेच्या साईटवर जाऊन अधिक माहितीसाठी उमेदवार नोटीफिकेशन पाहू शकता.

मुलाखतीच्या माध्यमातून रेल्वेतील या पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल. सिनिअर टेक्निकल असिस्टंट पदासाठी २० सप्टेंबर ते २२ सप्टेंबर पर्यंत मुलाखत कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. तर ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट पदासाठी उमेदवारांच्या मुलाखती २३ ते २५ सप्टेंबरपर्यंत आयोजित केल्या जातील.