अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थ्यांशी संवेदनशिल राहून त्यांना न्याय देण्याचे काम करा – दादाजी भुसे


मालेगाव : संजय गांधी योजनेसह सर्व अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थ्यांशी प्रशासनासह संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सर्व सदस्यांनी संवेदनशिल राहून समन्वय साधत लाभार्थ्यांना न्याय देण्याचे काम करावे असे आवाहन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

शासकीय विश्रामगृहातील सभागृहात राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे धनादेश मंत्री भुसे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले त्यावेळी आयोजित आढावा बैठकीत मंत्री भुसे बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उपविभागीय अधिकारी डॉ.विजयानंद शर्मा, तहसिलदार किशोर मराठे, नायब तहसिलदार (संगायो) विकास पवार, बाजार समितीचे उपसभापती सुनिल देवरे यांच्यासह संजय गांधी योजनेचे नवनियुक्त सदस्य उपस्थित होते.

तालुकास्तरावरील संजय गांधी योजनेच्या नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन व शुभेच्छा देतांना मंत्री भुसे म्हणाले, समितीच्या प्रत्‍येक सदस्याने तळागाळातील वंचित लाभार्थ्यांना शासनाच्या अर्थसहाय्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. गाव निहाय व गट निहाय लाभार्थ्यांच्या याद्या तयार कराव्यात. संबंधित तलाठी व पात्र लाभार्थी यांच्यामध्ये समन्वय साधून तालुक्यातील एकही पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. अशा सुचना मंत्री भुसे यांनी यावेळी दिल्या.

या आढावा बैठकीला ज्या बँकेचे प्रतिनीधी अनुपस्थित होते त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत मंत्री भुसे म्हणाले, स्थानिक राष्ट्रीयकृत बँकांनी आपल्या शाखेत लाभार्थ्यांचे खाते उघडण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. संगायो सारख्या अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थ्यांसाठी आपल्या बँकेत स्वतंत्र कक्ष स्थापन करून लाभार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी. योजनेतील महिला लाभार्थ्यांना सन्मानाची वागणूक देण्यात यावी. या योजनेतील प्रत्येक लाभार्थी हा वयोवृध्द असल्यामुळे त्यांच्या विषयी संवेदनशिल राहून त्यांची कामे प्राधान्याने करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थ्यांच्या कामासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी बँकांसह तलाठ्यांनी प्राधान्यक्रम ठरविण्याचे आवाहन करतांना अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम म्हणाले, संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा मिळणारे अर्थसहाय्य विलंबाने प्राप्त होण्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यासाठी प्रत्येक गाव व गटनिहाय माहिती संकलीत करून होणारा विलंब ज्या तलाठ्यांमुळे अथवा ज्या बँकेमुळे होत असेल त्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ नोटीस बजावण्यात यावी अशा सुचनाही अपर जिल्हाधिकारी निकम यांनी यावेळी दिल्या. तर गत दोन वर्षामध्ये मंजूर झालेल्या प्रकरणातील बरेच लाभार्थी हे मिळणाऱ्या लाभापासून वंचित आहेत त्याची चौकशी करून आवश्यक त्रुटींची पूर्तता करून लाभार्थ्यांना न्याय देण्यासाठी मोहिम स्वरूपात कामकाज करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.