मोदींच्या हस्ते जालियानवाला बाग राष्ट्राला समर्पित

२८ ऑगस्ट रोजी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऐतिहासिक जालियनवाला बाग स्मारक पुनर्निर्माण काम पूर्ण झाल्याने देशाला समर्पित केले जाणार आहे. या पुनर्निर्माण परिसराचे उद्घाटन पंतप्रधान व्हर्च्युअल कार्यक्रमात करणार आहेत. यात मानचिन्ह, थ्री डी चित्रण, चार संग्रहालये यांचा समावेश आहे. करोना मुळे गेले दीड वर्ष हे स्मारक सर्वसामान्य लोकांसाठी बंद होते मात्र आता उद्घाटन झाल्यावर ते सर्वांसाठी खुले होणार आहे.

पंजाब सरकारने २० कोटी रुपये खर्चून या ऐतिहासिक स्थळाचे पुनर्निमाण केले आहे. गतवर्षीच हे काम पूर्ण होणार होते मात्र करोना मुळे काम काही काळ बंद राहिले होते. जालियनवाला बागेमधली विहीर दुरुस्त करण्यात आली आहे. ब्रिटीश सैनिकांनी या ठिकाणी जमलेल्या निरपराध लोकांवर अचानक गोळीबार सुरु केला तेव्हा याच विहिरीत अनेकांनी जीव वाचविण्यासाठी उडी घेतली होती आणि त्यात अनेकजण प्राणाला मुकले होते.

या विहिरीच्या मागच्या बाजूला असलेल्या भिंतीवर आजही बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा पाहायला मिळतात. विहिरीच्या चारी बाजूनी एक पॅसेज बनविला गेला असून सुरक्षेसाठी काचा बसविल्या गेल्या आहेत. या परिसरात एक थियेटर उभारले गेले असून त्यात एकावेळी ८० प्रेक्षक बसू शकतात. येथे ब्रिटीश सेनेचा या स्थळी झालेला प्रवेश आणि त्यांनी केलेला बेछुट गोळीबार याची डिजिटल डॉक्युमेंटरी दाखविली जाणार आहे.