रोनाल्डो पुन्हा मँचेस्टर युनायटेड बरोबर करारबद्ध

फुटबॉल मधील सर्वश्रेष्ठ स्ट्रायकर क्रिस्तियानो रोनाल्डो पुन्हा एकदा इंग्लंडचा बडा क्लब मँचेस्टर युनायटेडच्या जर्सी मध्ये खेळताना दिसणार आहे. क्लबने रोनाल्डो बरोबर करार झाल्याची घोषणा नुकतीच केली आहे. रोनाल्डो २०१८ पासून इटलीच्या युवेंटस मधून खेळत होता. या क्लब बरोबर खेळताना रोनाल्डोने ९८ सामन्यात ८१ गोल केले आहेत.

मँचेस्टर क्लबने रोनाल्डोसाठी युवेंटस बरोबर सौदा केल्याची माहिती दिली आहे. मँचेस्टरने रोनाल्डो बरोबर नव्या करारासाठी २५ दशलक्ष युरो म्हणजे २१६ कोटी प्रती सिझनचा करार केला आहे. मात्र हा सौदा रोनाल्डोसाठी फायद्याचा नाही असे सांगितले जात आहे. कारण रोनाल्डोला युवेंटस प्रती सिझन ७३४ कोटी रुपये देत होते असे समजते. मँचेस्टर क्लब रोनाल्डोच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. यापूर्वी रोनाल्डो २००३ ते २००९ या काळात या क्लब कडून खेळाला आहे आणि २९२ सामन्यात त्याने ११८ गोल केले आहेत.

रोनाल्डो पाच वेळा बेलोन डी’ओर विजेता असून आत्तापर्यंतच्या करियर मध्ये त्याने ३० प्रमुख ट्रॉफी जिंकल्या आहेत.