पगाराचा आकडा ऐकल्यावर अमिताभ यांच्या अंगरक्षकाची झाली बदली

बॉलीवूडचे महान कलाकार अमिताभ बच्चन यांच्या संदर्भातली कोणतीही माहिती वेगाने व्हायरल होते हे पुन्हा सिद्ध झाले आहे. अमिताभ यांचे अंगरक्षक जितेंद्र शिंदे यांना बिग बी कडून दर वर्षाला दीड कोटी रुपये मिळतात ही बातमी बाहेर आल्याबरोबर मुंबई पोलीस कमिशनर हेमंत नागराळे यांनी शिंदे यांची तातडीने बदली केल्याचे वृत्त आहे. जितेंद्र शिंदे मुंबई पोलीस मध्ये हेड कॉन्स्टेबल असून त्यांना दीड कोटी रुपये वर्षाला मिळतात हे कळल्याबरोबर त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले गेले आहेत. २०१५ पासून शिंदे बिग बी यांचे अंगरक्षक असून ते स्वतःची सुरक्षा एजन्सी सुद्धा चालवितात असेही समजते.

ही माहिती प्रशासनाला कळताच कमिशनर नागराळे यांनी शिंदे यांची बदली, एक व्यक्ती एका ठिकाणी चार वर्षापेक्षा अधिक काळ काम करू शकत नाही असा नियम दाखवून डी.बी. मार्ग पोलीस स्टेशनवर केली आहे.

शिंदे बिग बी यांचे खासगी अंगरक्षक आहेत. बिग बी यांच्या सुरक्षेसाठी ते २४ तास मौजूद असतात. केबीसी शुटींग दरम्यान सुद्धा ते सावली प्रमाणे बिग बी यांच्या सोबत असतात. शिंदे यांना वर्षाला दीड कोटी मिळत असतील तर ते बिग बी देतात की अन्य मार्गाने त्यांना हा पैसा मिळतो याचा तपास सुरु आहे. शिंदे यांच्या म्हणण्यानुसार पत्नीच्या नावे त्यांची सुरक्षा एजन्सी असून त्यांना आत्तापर्यंत बिग बी यांनी वर्षाला दीड कोटी कधीच दिलेले नाहीत. अमेरिकी अभिनेता एलिजा वूड भारतात आला होता तेव्हा बिग बी यांच्या सांगण्यावरून त्यालाही शिंदे यांनी सुरक्षा दिली होती.