कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कायम; काल दिवसभरात आढळले ४४ हजार रुग्ण


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांची संख्या गेल्या दोन दिवसांपासून ४० हजारांच्यावर गेली आहे. दरम्यान काल दिवसभरात देशात ४४ हजार ६५८ नवे रुग्ण आढळले असून ४९६ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नवीन रुग्णांच्या नोंदीसह देशातील एकूण रुग्णसंख्या ३ कोटी २६ लाख ३ हजार १८८ झाली आहे. त्यापैकी ३ कोटी १८ लाख २१ हजार ४२८ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे एकूण ४ लाख ३६ हजार ८६१ जणांना जीव गमवावा लागला आहे.

काल दिवसभरात ३२ हजार ९८८ रुग्ण बरे झाले असल्यामुळे रिकव्हरी रेट ९७.६० टक्क्यांवर आहे. देशात सध्या ३ लाख ४४ हजार ८९९ सक्रिय रुग्ण उपचाराधिन आहेत. देशाचा विकली पॉझिटीव्हीटी रेट २.१० टक्क्यांवर आहे. हा दर गेल्या ६३ दिवसांपासून तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर, डेली पॉझिटीव्हीटी रेट २.४५ टक्के असून तो गेल्या ३२ दिवसांपासून तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासांत ७९ लाख ४८ हजार ४३९ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे, तर लसीकरण मोहिमेअंतर्गत आतपर्यंत ६१ कोटी २२ लाख ८ हजार ५४२ जणांचं लसीकरण झाले आहे. देशात गेल्या २४ तासांत आढळलेल्या ४४ हजार ६५८ रुग्णांपैकी तब्बल ३० हजार ७ रुग्ण एकट्या केरळ राज्यातील आहेत. तर, ४९६ मृतांपैकी १६२ मृत्यू हे केरळमध्ये झाले आहेत.