नारायण राणेंच्या गंभीर आरोपांवर शिवसेनेचे देखील गंभीर सवाल


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद आणखीनच वाढत चालला आहे. आता राणे विरुद्ध शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. नारायण राणे यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर आता राणेंवर शिवसेनेनेही टीकास्त्र सोडले आहे. काही प्रकरणांचा दाखला देत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर निशाणा साधल्यामुळे दोन्ही बाजूने होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांमुळे हे प्रकरण येत्या काही दिवसात आणखी चिघळेल असेच चित्र सध्यातरी दिसत आहे.

त्यांनी केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याची वेळच का यावी? याचा अभ्यास केला तर बरे होईल. जे निर्बंध महाडच्या न्यायाधीशांनी घातले आहेत, यातून राणे चुकले आहेत हे स्पष्ट होत आहे. अपराध केला असेल, तर मग पोलीस हे पकडणार असल्याची टीका करताना शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर गंभीर आरोप केले.

नारायण राणे जेव्हा इतरांवर आरोप करतात, तेव्हा अंकुश राणेसारख्या सख्ख्या चुलत भावाची हत्या कोणी केली? कुठे झाली? हत्या केल्यानंतर कोणत्या गाडीत टाकले आणि जाळले याची कधी विचारपूस तुम्ही केली आहे का? असे मला त्यांना विचारायचे असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्याचबरोबर चिंटू शेखला ऑफिसात जाऊन तुमच्या मुलाने गोळ्या घातल्या. त्याची कधी विचारपूस केली आहे का?, असे गंभीर आरोप एबीपी माझाशी त्यांनी बोलताना केले. आम्हाला राणेंचे बाकी काय धंदे चालतात हे उकरुन काढायचे नाही. पण राज्यातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद आणि विधानसभेत नारायण राणे यांची कुंडली तयार केली होती आणि सभागृहात वाचून दाखवली होती त्याचा अभ्यास आता महाराष्ट्र सरकारला करण्यास सांगणार असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.

दुसरीकडे, कुणाचेही नाव न घेता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काही आरोप केले होते. आपल्या वहिनीवर अ‍ॅसिड फेकायला कुणी सांगितले? काय तुमचे संस्कार? आपल्याच भावाच्या पत्नीवर अ‍ॅसिड फेकले. मी टप्प्याटप्प्याने ही प्रकरणे बाहेर काढणार आहे. सुशांतची केस अद्याप संपलेली नाही आहे. अजूनही दिशा सालियान प्रकरण बाकी आहे. आम्ही भारतीय नागरिक आहोत. जो कायदा तुम्हाला तो आम्हालाही आहे. दादागिरी करू नका. तो तुमचा पिंड आहे. तुम्ही आम्हाला अनुभवले आहे. आमच्या वाटेला जाऊ नका. आता पूर्वीसारखा दोन दिवसात आवाज खणखणीत झाल्यानंतर वाजवणार, असा इशारा त्यांनी दिला होता.