राणेंच्या बंगल्यासमोर मार खाणाऱ्या ‘त्या’ युवासेना कार्यकर्त्याची बढती; नितेश राणेंनी पोस्ट केला आदित्य ठाकरेंचा फोटो


मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मंगळवारपासून सुरु असणारा राणे विरुद्ध शिवसेना हा वाद शाब्दिक स्वरुपामध्ये सलग चौथ्या दिवशीही सुरु आहे. दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच आता शिवसेनेवर ट्विटरवरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे. राणेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर मंगळवारी राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील जुहूमध्ये राणेंच्या घरासमोर आंदोलन केल्यानंतर शिवसेनेने युवासेनेतील काही पदाधिकाऱ्यांना बढती दिल्याचा दावा केला जात असून त्यावरुनच नितेश राणेंनी एक फोटो ट्विट करत शिवसेनेला टोला लगावला आहे.

जुहू येथील राणेंच्या बंगल्याबाहेर निदर्शने करणारे युवासेनेचे कार्यकर्ते आणि राणेंचे समर्थक यांच्यात हाणामारी सुरू झाल्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. तसेच या ठिकाणी शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आल्यानंतर दोन्हीकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. दरम्यान या सर्व गोंधळामध्ये काही कार्यकर्ते जखमी झाल्याचा दावा केला जात आहे. पत्रकार परिषदेमध्ये बुधवारी नारायण राणेंनीही मार खाऊन १२ जण हॉस्पिटलमध्ये असल्याचा टोला शिवसेनेच्या या आंदोलनासंदर्भात बोलताना लगावला होता.

नारायण राणे यांना पत्रकारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून तुमच्या घराखाली आंदोलन करणाऱ्यांचे कौतुक केले त्यावर काय सांगाल असा प्रश्न विचारला होता. त्यावर ते जरा माननीय शरद पवारांना सांगा ना कोणाची पाठ थोपटावी? काय सीमेवरुन पराक्रम करुन आले का? मार खाऊन आले. १२ जण हॉस्पिटलला आहेत. त्यांनी हे सांगितले असेल तुम्ही मार खाऊन आलात ना, हॉस्पिटला अ‍ॅडमिट आहात ना तर तुमचा सत्कार, असा टोला नारायण राणेंनी लगावला. आता नितेश राणेंनी याच मुद्द्यावरुन शिवसेनेसाठी पोलिसांचा मार खाल्ल्यावर बढती मिळते, असा दावा करणारा एक फोटो पोस्ट केला आहे.


नितेश राणेंनी शेअर केलेल्या फोटोमध्ये एका बाजूला राज्याचे पर्यटनमंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरेंसोबत एक तरुण हस्तांदोलन करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे एका व्यक्तीला पोलीस मारहाण करताना दिसत आहेत. या दोन्ही व्यक्ती म्हणजे युवासेनेचा कार्यकर्ता असल्याचा दावा नितेश राणेंनी केला आहे. तसेच मंगळवारी जुहू येथे राणेंच्या बंगल्याबाहेर मार खाणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी हा एक कार्यकर्ता असल्याचेही नितेश राणे म्हणाले आहेत. राणेंच्या बंगल्यासमोर मार खाणाऱ्या ‘त्या’ युवासेना कार्यकर्त्याची बढती. आज पण राणेंमुळे शिवसेनेत पदे मिळतात. सिर्फ नाम ही काफी है, अशी कॅप्शन त्यांनी या फोटोला नितेश राणेंनी दिली आहे.