प्रताप सरनाईकांनी पत्रकार परिषद घेत दिला शंकाकुशंकांना विराम


मुंबई – शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी ईडीच्या कारवाईनंतर आपली व्यथा मांडली आहे. सरनाईक गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेबाहेर होते. पण त्यांनी आज स्वतः दहीहंडीच्या निमित्ताने पत्रकार परिषद घेत त्यांनी शंकाकुशंकांना विराम दिला आहे. विरोधकांनी मी वैयक्तिक कारणासाठी बाहेर असल्याचा फायदा घेतला आणि त्यांची राजकीय पोळी भाजून घेतली, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

प्रताप सरनाईक यावेळी एबीपी माझाशी बोलताना म्हणाले, माझ्या कौटुंबिक कारणांमुळे मी काही काळ बाहेर असल्यामुळे विरोधकांनी त्याचा गैरफायदा घेतला आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी प्रयत्न केले. काही आरोप प्रत्यारोप केले. पण माझ्यावर ईडीने कारवाई केल्यापासून माझी न्यायालयीन लढाई सुरू आहे. मला सर्वोच्च न्यायालयाचेही संरक्षण आहे. मी गरजेप्रमाणे ईडीलाही वारंवार सहकार्य करत असतो आणि यापुढेही मी ह्याच धोरणाने काम करेन. मी लोकप्रतिनिधी असल्याने तपासाला सहकार्य करणे माझी जबाबदारी आहे.

सरनाईक ईडी कारवाईच्या दरम्यानचा काळ कसा होता, त्याबद्दल सांगताना म्हणाले, माझी अजूनही ईडी चौकशी पूर्ण झालेली नाही. दरम्यानच्या काळात माझी दोनवेळा अँजिओप्लास्टी झाली, पत्नीचे कॅन्सरचे ऑपरेशन झाले. पण तरीही मी उभा राहिलो कारण लोकांनी मला लोकसेवेसाठी निवडून दिलेले असल्यामुळे स्वतःच्या दुःखण्यावर पांघरुण घालावे लागते. आपल्यावर आलेले प्रसंग कोणावर येऊ नये, असे मनापासून वाटते. काही न करता जर आरोप प्रत्यारोप आपल्यावर होत असतील, तर अशा आरोपांमुळे व्यवसायात प्रचंड अडचणी येत आहेत. बँका, भागीदार मदत करताना विचार करतात, ग्राहकही फारसा रस दाखवत नाही.