मुकेश अंबानी यांच्या कोरोना प्रतिबंधक लसीला मिळाली क्लिनिक ट्रायलची परवानगी


नवी दिल्ली : मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स लाईफ सायन्सेसकडून तयार केल्या जात असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीला डीसीजीआयकडून क्लिनिकल ट्रायलची परवानगी मिळाली आहे. ही दोन डोसची रिकॉम्बिनेंट प्रोटीन-बेस्ड लस आहे. रिलायन्स लाईफच्या अर्जाचे एसईसीच्या बैठकीत अवलोकन झाले आणि मंजूरी देण्यात आली.

यासंदर्भात इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार रिलायन्सने आपल्या प्रस्तावित लसीच्या फेज-1 चाचणीसाठी डीसीजीआयशी संपर्क साधला होता. रिलायन्स लाईफ ही रिलायन्स इंडस्ट्रीजची अधिकृत कंपनी आहे. ही कंपनी मागील काही दिवसांपासून लसीवर काम करत असल्याचे सांगितले जात आहे. 58 दिवसांची टॉलरेटेड डोसच्या ताकदीच्या चाचणीसाठी सामान्यपणे फेज-1 ट्रायल असते. जी पूर्ण झाल्यानंतर फेज 2 आणि फेज 3 साठी ट्रायलसाठी अर्ज केला जातो.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेक कोव्हॅक्सिनचा देशात सर्वात जास्त वापर होत आहे. तर भारतात इमर्जन्सी वापरासाठी रशियाची स्पूटनिक व्ही, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन आणि झायडस कॅडिलाच्या कोरोना प्रतिबंधक लसीला परवानगी दिली आहे.