काबुल – गुरुवारी रात्री अफगाणिस्तानच्या काबुल विमानतळावर झालेल्या दोन स्फोटांमुळे 72 लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटांचा तालिबानने निषेध केला असून ISIS-K (इसिस-खुरासाना) या दहशतवादी गटाने या स्फोटांची जबाबदारी स्वीकारली आहे. तर दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी या दहशतवाद्यांना आम्ही माफ करणार नसून त्यांना याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा दिला आहे.
ISIS-K ने स्वीकारली काबुल विमानतळावरील स्फोटाची जबाबदारी
आपल्या टेलिग्राम अकाऊंटवरुन या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत असल्याचे ISIS-K (इसिस-खुरासाना) या दहशतवादी गटाने जाहीर केले. काबुल विमानतळावर गुरुवारी रात्री झालेल्या दोन स्फोटांमध्ये किमान 60 अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाला असून 150 हून जास्त नागरिक जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या व्यतिरिक्त या हल्ल्यामध्ये 11 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या आकड्यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान आम्ही या हल्लेखोरांना माफी करणार नाही, या हल्ल्याला जशास तसे उत्तर देणार असून अफगाणिस्तानमधून अमेरिकन नागरिकांना सुरक्षित परत आणण्याची मोहीम सुरुच राहणार असल्याचे अमेरिकन अध्यक्ष जो बायडेन म्हणाले.
काबुल विमानतळावर आयएसआयएस या दहशतवादी गटाकडून हल्ला करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेने दिली होती. ब्रिटनचे संरक्षण सचिव जेम्स हिप्पी म्हणाले होते की, या हल्ल्याचे तपशील देता येणार नाहीत, पण हा हल्ला होणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. गुप्तचर इनपुटमध्ये असे म्हटले होते, की हा हल्ला आयएसआयएसकडून केला जाऊ शकतो. तालिबानने यापूर्वी पंजशीर वगळता संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेतले आहे. तेव्हापासून हजारो लोकांनी अफगाणिस्तान सोडले आहे.
अफगाणिस्तान तालिबानने ताब्यात घेतल्यापासून हजारो नागरिक आपल्या जीवाच्या भीतीने अफगाणिस्तान सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व लोकांनी काबुल विमानतळावर एकच गर्दी केली असून या विमानतळाचा ताबा आता अमेरिकन सैन्याने घेतला आहे.