मी गुन्हेगारी प्रवृत्तीचा होतो, तर मला मुख्यमंत्री का केले ?; नारायण राणेंचा सवाल


रत्नागिरी – मुंबईतून १९ ऑगस्टला सुरु झालेली जन आशीर्वाद यात्रा रत्नागिरीत शुक्रवारी पोहोचली आहे. सिंधुदुर्गमध्ये या यात्रेचा समारोप होणार आहे. दरम्यान, रत्नागिरीत पत्रकार परिषदेत घेत नारायण राणे यांनी शिवसेनेला इशारा दिला. नारायण राणेंनी महाडमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाखाली लागवण्याचे वक्तव्य केल्यानंतर शिवसेना-भाजपा आमने-सामने आली होती आणि राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक करून, महाडच्या न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर झालेल्या सुनावणीत नारायण राणेंना जामीन मंजूर करण्यात आला होता.

आता दोन दिवसानंतर पुन्हा जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे. दरम्यान, नारायण राणे यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता, त्यांच्यावर टीका केली. जगाच्या पाठीवर घरात राहून, पिंजऱ्यात राहून कोणी सत्ता चालवली नसल्याचे राणे म्हणाले. तसेच संजय राऊत आणि विनायक राऊत हे शिवसेनेला बुडवतील, असे राणे म्हणाले.

घरात घुसून राज्यात बलात्कार होत आहेत, दरोडे पडत आहे. खून, मारामाऱ्या होत आहेत, हे विसरु नका. सुशांतची हत्या झाली, दिशा सॅलियनची बलात्कार करुन हत्या झाली, अजून आरोपी मिळाले नाहीत, असे अनेकजण आहेत. खरे आरोपी मिळत नाही आणि मिळणारही नाहीत. नारायण राणेच्या पाठी लागू नका, अन्यथा सगळेच बोलावे लागेल ते परवडणार नाही. मी एवढा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होतो, तर मला मुख्यमंत्री कसे काय केले. मंत्रीपद कसे काय दिले, असा सवाल नारायण राणे यांनी यावेळी उपस्थित केला.

नारायण राणे पुढे म्हणाले, कोणताही गुन्हा मी केलेला नाही, पण काहीजण सत्तेची मस्ती दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही देखील भविष्यात महाराष्ट्राच्या सत्तेत येऊ, राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे १ लाख ५७ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. ही यांची ख्याती आहे. येथे सभा घेऊ नका, तिथे जाऊ नका, ही बंधने फक्त माझ्यासाठी आहेत, अशी मनाई कोरोना होता, तेव्हा का झाली नाही, असा सवाल देखील उपस्थित केला.