आरबीआयच्या क्रिप्टोकरन्सीबाबत गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे मोठे वक्तव्य


नवी दिल्ली : आपल्या डिजिटल चलनावर बऱ्याच काळापासून भारतीय रिझर्व्ह बँक काम करत आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास सीएनबीसीशी बोलताना म्हणाले की, आपल्या डिजिटल चलनासाठी डिसेंबर 2021 पर्यंत आरबीआय चाचणी कार्यक्रम सुरू करू शकते. या दिशेने जगभरातील केंद्रीय बँका काम करत आहेत. चीन, युरोप आणि यूकेची सेंट्रल बँक क्रिप्टोकरन्सीच्या व्यावसायिक आणि सार्वजनिक वापरासाठी शक्यतांवर विचार करीत आहे.

CBDC (central bank digital currencies) असे नाव केंद्रीय बँकेने जारी केलेल्या डिजिटल चलन किंवा क्रिप्टोकरन्सीला देण्यात आले आहे. पूर्ण कायदेशीर या चलनाला मान्यता असेल. सध्याच्या फिएट चलनाची ही डिजिटल आवृत्ती असेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आपण सीबीडीसीबद्दल खूप सावध आहोत, कारण ती पूर्णपणे नवीन संकल्पना असल्याचे शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले.

रिझर्व्ह बँक डिजिटल चलनाच्या विविध पैलूंवर गांभीर्याने विचार करत आहे. सर्वप्रथम ते प्रत्येक प्रकारे सुरक्षित असले पाहिजे. या व्यतिरिक्त, त्याचा भारतीय वित्तीय व्यवस्थेवर कोणताही नकारात्मक परिणाम होऊ नये. विशेषतः कोरोनानंतर, अर्थव्यवस्थेवर अजूनही दबाव आहे. अशा स्थितीत, सेंट्रल बँक आर्थिक बाजाराबाबत अत्यंत सावध आहे.

सर्वोच्च न्यायालयाने बंदी हटवल्यानंतर क्रिप्टोकरन्सीसंबंधी भारतातील क्रेझ खूप वाढली आहे. ग्लोबल क्रिप्टो अॅडॉप्शन इंडेक्स 2021 मध्ये भारताचा दुसरा क्रमांक आहे. त्याने चीन, अमेरिका, यूके आणि इंग्लंड सारख्या देशांना मागे टाकले आहे. जून 2020 ते जुलै 2021 दरम्यान क्रिप्टोकरन्सीच्या स्वीकृती दरात 880 टक्के वाढ झाली आहे. 2019 च्या तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत (ऑक्टोबर-डिसेंबर 2019), त्यात 2300 टक्के ऐतिहासिक वाढ नोंदवण्यात आली आहे.