मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीची एकनाथ खडसेंवर मोठी कारवाई; जप्त केली ५ कोटी रुपयांची मालमत्ता


मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणामुळे मोठी वाढ झाली आहे. खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई करत ५ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी गेल्या काही दिवसांपासून ईडीकडून केली जात होती. खडसे यांच्या जावयाला एका प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता एकनाथ खडसेंवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

लोणावळा आणि जळगाव येथील एकनाथ खडसे यांची ५ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. एकनाथ खडसेंची मनी लाँडरिंग प्रकरणात चौकशी केली जात असतानाच ही कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे.

ईडी’च्या आरोपानुसार खडसे २०१६ मध्ये महसूलमंत्री असताना त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनी पुण्यातील भोसरी येथील एक भूखंड विकत घेतला. ३१ कोटी रुपये या भूखंडाचा बाजारभाव असताना तो अवघ्या तीन कोटी रुपयांना गिरीश यांनी विकत घेतला. हा भूखंड एमआयडीसीच्या मालकीचा होता. एवढ्या कमी किंमतीत व्यवहार कसा काय झाला? गिरीश यांनी तो विकत घेण्यासाठी गोळा केलेल्या तीन कोटी रुपयांचा स्रोत काय? या मुद्यांवर ‘ईडी’चा तपास सुरू केला होता.

एकनाथ खडसे यांच्या अडचणीत भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणामुळे मोठी वाढ झाली आहे. ईडीकडून खडसे यांच्या जावयाला अटक करण्यात आलेली असून, सध्या त्यांची चौकशी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी खडसेंसंदर्भातील झोटिंग समितीचा गोपनीय अहवाल मंत्रालयातून गायब झाल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. दरम्यान हा अहवाल सापडला असून या अहवालात एकनाथ खडसेंनी पदाचा गैरवापर केल्याचे म्हटले होते.