४०० वर्षात एकदाच डागली गेली ही तोफ

भारतात एक खास तोफ आहे आणि ती जगातील सर्वात मोठी तोफ असल्याचे सांगितले जाते. या तोफेविषयी बरीच चर्चा होते. या तोफेतून उडविल्या गेलेल्या गोल्यामुळे एक तलाव तयार झाला आहे आणि आजही हा तलाव पाण्याने भरलेला असून स्थानिक त्या पाण्याचा वापर करतात असेही समजते.

प्राचीन काळापासून युद्धात तोफा वापरल्या जात आहेत. राजे राजवाडे लढाईत वर्चस्व राखण्यासाठी तोफा वापरत असत कारण तोफा हे घातक शस्त्र आहे. लढाईत तोफा शत्रूचे मोठे नुकसान करू शकतात. आजही सर्व देश तोफा वापरतात. फक्त आजच्या तोफा अत्याधुनिक आणि अधिक घातक आहेत. आपण ज्या तोफेबद्दल बोलतो आहोत ती जयपूर मध्ये जयगड किल्ल्यावर असलेली तोफ आहे आणि तिचे नाव आहे ‘जयबाण’

१३ -१४ व्या शतकापासून युरोपात युद्धात तोफा वापरल्या गेल्याचे पुरावे आहेत. पानिपतच्या पहिल्या लढाईत बाबराने तोफांचा वापर केला होता. जयबाण तोफ राजा जयसिंग यांनी जयगड किल्ल्यात १७२० साली बसविली. विशेष म्हणजे ही तोफ किल्ल्याबाहेर कधीच नेली गेली नाही कारण तिचे प्रचंड वजन. ही तोफ युद्धात वापरायची वेळ कधीच आली नाही.

जयबाण तोफेचे वजन ५० टन असून दोन चाकी गाड्यावर ती बसविली आहे. या गाड्याच्या चाकांचा व्यास साडेचार फुटी असून त्याला आधार म्हणून आणखी दोन चाके आहेत. तोफेचा व्यास ९ फुटी आहे आणि तिच्यात ५० किलो वजनाचा गोळा ठासला जात असे. तोफेच्या नळीची लांबी ६.१५ फुट असून ही तोफ जयगड येथील कारखान्यातच बनविली गेली होती. दसऱ्याला या तोफेची पूजा केली जाते.

या तोफेची चाचणी एकदाच घेतली गेली. तिच्यातून डागलेला गोळा ३५ किमीवर जाऊन पडला आणि त्याठिकाणी एक तलाव निर्माण झाला असे सांगतात. या तलावात आजही पाणी आहे.