शहीद सैनिकांसाठी अर्ध्यावर उतरविला गेला अमेरिकचा राष्ट्रध्वज

अफगाणिस्थान मधील काबुल विमानतळाबाहेर गुरुवारी झालेल्या आत्मघाती स्फोटात किमान ७२ मृत्यू झाले असून त्यात १३ अमेरिकन नौसैनिक शहीद झाले आहेत तर अन्य १८ जखमी झाले आहेत. सैनिकांशिवाय १४३ अन्य जखमी झाले आहेत. या शहीद सैनिकांच्या मृत्यूचा शोक व्यक्त करण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवासावरील म्हणजे व्हाईट हाउस वरील राष्ट्रध्वज ३० ऑगस्ट पर्यंत अर्ध्यावर उतरविला गेला आहे. काबुल विमानतळाबाहेरच्या हल्ल्याची जबाबदारी इसीसने स्वीकारली आहे. दरम्यान या हल्ल्यातील मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी इसीसने त्यांच्या कृत्याचे परिणाम भोगण्यास तयार राहावे असा इशारा दिला आहे. बायडेन म्हणाले आमच्या सैनिकांचा जीव घेणाऱ्या सर्व दहशतवाद्यांना शोधून ठार करू. त्यांना किंमत चुकवावी लागेल. आम्ही ही जखम विसरणार नाही. विशेष म्हणजे ट्रम्प प्रशासन काळात तालिबानबरोबर झालेल्या चर्चेत तालिबानने अफगाणीस्थानला दहशतवादी अड्डा बनवू नये यावर सहमती होती. पण काबुल स्फोटानंतर तालिबानींचा उद्देश स्पष्ट झाला आहे.

यातील पहिला स्फोट ऐबी गेटबाहेर करण्यात आला होता. तेथे ब्रिटीश आणि अमेरिकी सैनिक तैनात होते. दुसरा स्फोट बॅरल हॉटेल बाहेर झाला. या हल्ल्यात इसीसने प्रामुख्याने सैनिकांना टार्गेट केले होते. त्यामुळे अफगाणिस्थान मध्ये पुन्हा अमेरिका सक्रीय होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.