केंद्र सरकारच्या कामगार कल्याण आणि रोजगार विभागाचे मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते गुरुवारी ‘ई श्रम पोर्टल’ हे असंगठीत क्षेत्रातील कामगाराना लाभदायक ठरणारे पोर्टल लाँच करण्यात आले. याचा फायदा ३८ कोटी कामगारांना मिळणार आहे. असंगठीत क्षेत्रात काम करणाऱ्यासाठी केंद्र सरकारने बनविलेला हा पहिलाच डेटाबेस आहे. सरकार या पोर्टलच्या माध्यमातून राष्ट्रीय डेटा बेस तयार करत असून कामगारांना ‘ई श्रम कार्ड’ दिले जाणार आहे.
या श्रम कार्डावर १२ अंकी युनिक नंबर असेल आणि हे कार्ड संपूर्ण देशात वैध असेल. यासाठी http/:eshram.gov.in येथे जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी आधार नंबर व आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर, नाव, व्यवसाय, पत्ता, शिक्षण, कौशल्ये यांची माहिती द्यावी लागणार आहे. याचा फायदा सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ अधिक विस्ताराने करण्यासाठी होणार आहे. १६ ते ५९ वयोगटातील कुणीही त्यासाठी नोंदणी करू शकेल मात्र ईपीएफओ अगर ईएसआयसी चे तुम्ही सदस्य असाल तर तुमची नोंदणी होऊ शकणार नाही असे समजते.
इच्छुकांच्या मदतीसाठी राष्ट्रीय टोल फ्री नंबर १४४३४ असा आहे. या पोर्टलवर बिगारी कामगार, फिरते मजूर( ऊसतोडणी सारखे), घरकाम करणारे, भटके असे सर्व असंगठीत क्षेत्रातले मजूर नोंदणी करू शकतील.