अशी होते तालिबान सैन्यभरती

अफगाणिस्थानच्या मोठ्या भूभागावर कब्जा मिळविल्यानंतर तालिबानने लढवय्ये संख्या वाढविण्यासाठी मोठी भरती सुरु केली आहे. यात कुठून आणि कशी भरती केली जाते याचे काही अहवाल आले आहेत. ह्युमन राईट्स वॉचच्या म्हणण्यानुसार तालिबानने अफगाणिस्थान मध्ये सरकार स्थापन केलेले नसले तरी त्याची तयारी सुरु केली आहे. तानाशाहीसाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर सैनिक हवे आहेत आणि त्यामुळे लहान मुलांना प्रशिक्षण देऊन सैनिक बनविले जात आहे.

स्फोटके तयार करणे, त्याचा वापर करणे आणि प्रत्यक्ष युद्धात सहभाग अश्या प्रकारचे हे प्रशिक्षण असून त्याची सुरवात इस्लामिक धर्माचे शिक्षण देणाऱ्या मदरशा मधून होते. या मदरशा मध्ये सहा वर्षाच्या शिक्षणात कट्टरपंथी इस्लामी अनुयायी बनविले जातात आणि त्यांनाच सैनिकी प्रशिक्षण दिले जाते. मदरशामध्ये ६ वर्षापासून मुले येतात आणि ६ वर्षानंतर १३ -१४ वर्षाच्या मुलांना सैन्य प्रशिक्षण दिले जाते. १३ ते १७ वयोगटातील मुले युद्धात सहभागी होतात.

तालिबान कडून लहान मुलांना भरती केले जात नाही असे सांगितले जाते. त्यांच्या म्हणण्यानुसार दाढी मिशी येण्यापूर्वी मुलाना प्रत्यक्ष युद्धात उतरविले जात नाही. पण प्रत्यक्षात मात्र कंदुज,तखार, बडाखशान प्रांतात १३-१४ वर्षाची मुले सुद्धा सैन्यात भरती केली गेली आहेत. सैनिक भरतीत मदरसा मधील शिक्षण व्यवस्था हाच मुख्य आधार आहे. मानसिक दृष्ट्या ही मुले प्रथमच कडवे मुस्लीम होतात त्यांना फक्त सैनिकी प्रशिक्षण दिले की इस्लाम साठी कोणतेही समर्पण करण्यास ती तयार होतात.

तालिबानची स्थापना झाल्यापासून याच पद्धतीने सैन्य भरती केली जात असून तालिबानी मदरसे कुन्दुज सह अन्य तीन प्रांतात आहेत. २०१२ पासून ते सुरु आहेत. मुलांना सैन्य प्रशिक्षण मिळण्यासाठी पाकिस्तान सेनेची मदत घेतली जाते असेही सांगितले जाते.