मैदानात मोहम्मद सिराजवर बॉल भिरकवणाऱ्या प्रेक्षकांवर भडकला विराट कोहली


लीड्स – भारतीय संघाने लॉर्ड्सच्या दुसऱ्या कसोटीत जबरदस्त विजय मिळवल्यानतंर इंग्लंड संघापुढे तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी सपशेल लोटांगण घातले. आघाडीच्या फळीला अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने निष्प्रभ केल्यानंतर अन्य तीन तिघांनी भेदक मारा करीत भारताचा पहिला डाव फक्त ७८ धावांत संपुष्टात आणल्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी दिवसअखेर बिनबाद १२० धावांपर्यंत पहिल्या डावात मजल मारून ४२ धावांची आघाडी घेतली. दरम्यान यावेळी कर्णधार विराट कोहली मैदानात घडलेल्या एका प्रकारामुळे संतापला.

इंग्लंडच्या प्रेक्षकांकडून भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजला टार्गेट करण्यात आले. मोहम्मद सिराजला काही प्रेक्षकांनी प्लास्टिक बॉल फेकून मारल्यामुळे विराट कोहली संतापल होता. यानंतर विराटने मोहम्मद सिराजला तो बॉल मैदानाबाहेर फेकून देण्यास सांगितले.

यासंबंधी बोलताना ऋषभ पंतने सांगितले की, मला वाटते कोणीतरी मोहम्मद सिराजच्या दिशेने बॉल फेकला आणि हो त्यामुळे विराट कोहली संतापला होता. तुम्हाला काय हवे असेल ते तुम्ही बोलू शकता, पण अशा पद्धतीने खेळाडूंना वस्तू फेकून मारु नका. हे क्रिकेटसाठी योग्य नाही.