ईडीने सर्वोच्च न्यायालयात दिली चक्रावून टाकणारी माहिती; अंडरग्राऊंड आहे त्यांचे कार्यालय


नवी दिल्ली – अंडरग्राऊंड ऑफिसचा वापर युनिटेकचे संस्थापक रमेश चंद्रा करत होते आणि त्या ऑफिसला पॅरोल किंवा जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांचे पुत्र संजय चंद्रा आणि अजय चंद्रा यांनी भेट दिल्याची माहिती ईडीने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. चंद्रा आणि युनिटेक लिमिटेडच्या विरोधात ईडीकडून मनी लाँडरिंगच्या आरोपांची चौकशी सुरू आहे. तसेच संजय आणि अजय चंद्रा दोघंही न्यायालयीन कोठडीत आहेत. पण, तरीही ते तुरुंगाच्या आत राहून त्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत त्याचबरोबर मालमत्ता विकत असल्याचेही ईडीने म्हटले आहे.

कारागृहाबाहेर चंद्रांनी त्यांच्याबद्दलची माहिती बाहेरच्या जगाला देण्यासाठी अधिकारी नेमले असल्याचे न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि एम आर शाह यांच्या खंडपीठाला अंमलबजावणी संचालनालयाकडे हजर असलेल्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल माधवी दिवाण यांनी सांगितले.

आम्ही एक गुप्त भूमिगत कार्यालय आमच्या एका शोध आणि जप्ती ऑपरेशन दरम्यान शोधून काढले आहे, ज्याचा वापर रमेश चंद्रा करत आहेत आणि त्यांचे मुल पॅरोल किंवा जामिनावर असताना त्या ऑफिसला भेट देतात. आम्ही त्या कार्यालयातून शेकडो मूळ विक्री कागदपत्रे, शेकडो डिजिटल स्वाक्षऱ्या आणि देश आणि विदेशातील मालमत्तेसंदर्भात संवेदनशील डेटा असलेले अनेक कम्प्युटर जप्त केले असल्याचे माधवी दिवाण यांनी खंडपीठाला सांगितले. तसेच ईडीने सीलबंद कव्हरमध्ये दोन अहवाल न्यायालयात सादर केले असून त्यासोबत युनिटेक लिमिटेडच्या देश-विदेशातील ६०० कोटींच्या मालमत्तेसंदर्भातील माहिती जोडली आहे.

माधवी दिवाण यांनी यावेळी सांगितले की शेल कंपन्यांच्या माध्यमातून तयार केलेली मनी ट्रेलची एक साखळी ईडीला सापडली आहे. त्यांची संपत्ती ते त्याच्या माध्यमातून रिअल टाईममध्ये विकत असल्यामुळे तपासात अडचणी येत आहेत. तसेच चंद्रा जेलमध्ये राहून त्यांचे काम करत आहेत. ते न्यायालयीन कोठडीत असूनही बाहेरच्या लोकांशी संवाद साधत आहेत आणि कारागृहाच्या बाहेर नियुक्त केलेल्या लोकांच्या मदतीने सूचना देत आहेत.

दरम्यान चंद्रांचे वकील विकास सिंह यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तर, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की चंद्रा न्यायालयात हजर नसल्यामुळे सुनावणी होणार नाही. तर ईडीच्या निवदेनांवर सुनावणी घेतली जाईल. सर्वोच्च न्यायालयाने पूर्वी ४ जून रोजी संजय चंद्राला त्याच्या सासऱ्याच्या अंत्यसंस्कारांमध्ये सहभागी होण्यासाठी १५ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यानंतर त्याने आत्मसमर्पण केले होते.

ऑगस्ट २०१७ पासून तुरुंगात असलेल्या चंद्राचा भाऊ अजय चंद्राचा जामीन अर्जही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता. घर खरेदीदारांचे पैसे लुबाडल्याचा आरोप संजय आणि अजय या दोघांवर आहे. ऑक्टोबर २०१७ च्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये ७५० कोटी रुपये जमा करण्यास सांगितले होते. तर, न्यायालयाच्या अटींचे पालन करून ७५० कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा केल्यामुळे नियमित जामीन दिला जातो, असा दावा चंद्रांनी केला आहे.