पुणे – नारायण राणेंच्या वक्तव्यावरुन गेल्या काही दिवसांपासून राज्यात चाललेल्या गदारोळावर अनेक राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राणेंच्या वक्तव्याचे समर्थन नाही, पण पक्ष राणेंच्या पाठीशी उभा असल्याचे सांगितले. आता नारायण राणे यांना भाजप नेते व खासदार गिरीश बापट यांनी मात्र टोला लगावला आहे. बोलताना राजकीय नेत्यांनी पथ्य पाळायला हवे, अशा शब्दात त्यांनी राणेंना घरचा आहेर दिला आहे.
मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावर स्वपक्षीय गिरीश बापटांचा नारायण राणेंना अप्रत्यक्ष टोला
भाजप खासदार गिरीश बापट माध्यमांशी बोलताना म्हणाले, मला असे वाटते की राजकीय पक्षात मतभेद असतात. पण सर्वच पक्षांच्या सर्व नेत्यांनी बोलताना पथ्य पाळली पाहिजेत. सामान्य जनतेला हे आवडत नाही. जे सामान्य जनतेला जे आवडते, जे चांगले आहे ते आपण करायला हवे. त्यामुळे एकमेकांवर कुरघोडी करण्यापेक्षा जनतेत जाऊन जनतेची कामे आपण करु. मुख्यमंत्री असो किंवा नारायण राणे यांनी आपापली मते मांडायला आमची हरकत नाही. पण अनेक गोष्टीत अडचणी दिसतात आणि मग त्याचं रुपांतर नको त्या गोष्टीत होते. हे आपण सगळ्यांनी टाळले पाहिजे.