CDS जनरल बिपिन रावत यांचा तालिबान्यांना सज्जड दम; आमच्या वाकड्यात जाऊ नका


नवी दिल्ली : तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर भारतीय लष्कराकडून आता मोठे वक्तव्य करण्यात आले आहे. आमच्याकडे वाकड्या नजरेने बघाल, तर तुम्हाला सडेतोड उत्तर देण्यात येईल, असा सज्जड दम चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांनी तालिबानी दहशतवाद्यांना भरला आहे. अफगाणिस्तानमधून भारतीय भूमीत करण्यात येणाऱ्या भविष्यातील प्रत्येक दहशतवादी हालचालींना उत्तर देण्याची तयारी भारतीय लष्कराने केल्याचे ते म्हणाले.

बिपिन रावत पुढे म्हणाले की, 20 वर्षापूर्वी जे रुप अफगाणिस्तानवर कब्जा केलेल्या तालिबानचे हे होते तेच आजही तसेच असल्यामुळे आताही भारतात त्या वेळेप्रमाणेच घुसखोरी होण्याची शक्यता असून त्यासंबंधीच्या प्रत्येक आव्हानाला तोंड देण्याची तयारी करण्यात आली आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कराने आपातकालीन योजना तयार केली आहे.

तसेच तालिबानी अफगाणिस्तानवर कब्जा करणार हे निश्चित होते. पण एवढ्या तात्काळ हालचाल करतील आणि अफगाणिस्तानची सत्ता हातात घेतील, असे वाटले नसल्याचे बिपीन रावत म्हणाले. आताची तालिबान ही 20 वर्षापूर्वीची तालिबान असून फक्त त्याचे सहकारी बदलले असल्याचे देखील बिपिन रावत म्हणाले. त्यामुळे भारताची चिंता वाढली असून या आव्हानाला तोंड आपण आपातकालीन योजना तयार केल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.