देशात काल कोरोनाबाधितांच्या आकडेवाढीचा उद्रेक; 46 हजार रुग्णांची नोंद, तर 607 जणांचा मृत्यू


नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशातील कहर काही केल्या कमी होताना दिसत नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत काल पुन्हा एकदा वाढ झाली असून मंगळवारच्या तुलनेत नऊ हजार रुग्णांची अतिरिक्त वाढ बुधवारी झाली आहे. काल दिवसभरात देशात 46 हजार 164 कोरोनाबाधितांची भर पडली आहे, तर 607 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 34 हजार 159 बाधितांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. दरम्यान देशातील कोरोनामुळे मृत्यु होण्याचा दर हा 1.34 आहे तर रिकव्हरी रेट हा 97.68 टक्के आहे. देशातील सक्रिय रुग्णसंख्या ही 0.98 टक्के एवढी आहे.

महाराष्ट्रात काल दिवसभरात 5031 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 380 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 47 हजार 414 बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.04 टक्के आहे. राज्यात काल दिवसभरात 216 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा डेथ रेट 2.12 टक्के झाला आहे. तब्बल 35 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 50 हजार 183 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 12,673 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.